पिंजारझाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे कामकाज उघड्यावर

0

साक्री । तालुक्यातील पिंजारझाडी गावात ग्रृप ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीची इमारतीचे छतासह भिंत पडल्याने उघड्यावरच कामकाज करावे लागत आहे. नवीन इमारत बांधून मिळावी यासाठी सरपंचांसह, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पिंजारझाडी गाव हे आदिवासी बहुलक्षेत्रात मुख्य बाजारेपेठेचे केंद्रबिंदू मानले जाते. याठिकाणी परिसरातील नागरिकांना शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्र तयार करण्यासाठी पिंजरझाडी ग्रृप ग्रामपंचायतीत यावे लागते. मात्र, या ग्रामपंचायतीची इमारत जीर्ण झाली असून याठिकाणी कामकाज करणे कठिण झाले आहे. पावसाळा सुरू झाल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज दुसर्‍या ठिकाणी करावे लागत आहे. नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.

राजकीय वारसाचा परंपरा
पिंजरझाडी गावाला ग्रृप ग्रामपंचायत असल्याने त्यात बुरूडखे, पाचमौली, साबरसोडा या गावांचा समावेश आहे. पिंजारझाडी गावाला मोठा राजकीय वारसा लाभला आहे. गावाची ग्रामपंचायतची इमारत पडकी झाली आहे. माजी खासदार रामदास रूपला गावीत, माजी आमदार कै. गाकुळ रूपला गावीत, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ गावीत यांचे गाव आहे.

आमदार अहिरेंचे आश्‍वासन
गल्ली ते दिल्ली पर्यंत सरपंचांनी पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होवू शकाला नसल्याने येत्या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा सरपंचासह ग्रामस्थांनी दिला आहे. साक्री तालुक्याचे आमदार डी. एस. अहिरे यांनी पिजारझाडी ग्रृप ग्रामपंचायतीला भेट देऊन नवीन इमारतीच्या बांधकामसाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्‍वासन दिले आहे. यावेळी सरपंच मिना साबळे, उपसरपंच गुलाब पवार, श्रावण गावीत, दत्तु जगताप, सोमनाथ गावीत, रामचंद्र साबळे, किशोर गावीत, कैलास गावीत, मकर्ट गावीत आदी उपस्थित होते.