पिंपरीगावातील तलावाचेही भाजप लोकार्पण करणार

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने मनमानी कारभार केला असून, केवळ आपल्या नावाची पाटी लागावी, यासाठी अपूर्ण कामांचे उद्घाटन करण्यात आल्याचे चर्चिले जात आहे. संभाजीनगरातील जलतरण तलावाच्या लोकार्पणानंतर आता भाजपतर्फे पिंपरीगावातील तलावाचेही लोकार्पण केले जाणार आहे. संभाजीनगर तलावाच्या लोकार्पणावरून वादाची ठिणगी पडली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पुढे आता पिंपरीगावातील लोकार्पण सोहळ्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत भडका होण्याची चिन्हे आहेत. आता या लोकार्पणावेळी काय धमाका होणार? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

सारे काही श्रेयासाठीच!
पिंपरीगावात बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचे काम अर्धवट असताना देखील माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे डिसेंबर महिन्यात उद्घाटन करण्यात आले. चार महिने होत आले तरी अद्याप हा तलाव नागरिकांसाठी खुला झालेला नाही. राष्ट्रवादीने निवडणुकीआधी अपूर्ण कामांची उद्घाटने करून मते मिळावीत यासाठी नागरिकांची फसवणूक केल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्यासाठी कार्यालय मिळविणे असो की अपूर्ण कामांचे लोकार्पण असो; भाजप सत्ताधारी आहे, हेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना सहन होत नसल्याचे चित्र आहे. आम्ही सांगू तसेच झाले पाहिजे, ही अंगात भिनलेली वृत्ती कायम असल्यामुळे महापालिकेत आम्हाला न विचारता कोणतीच गोष्ट होता कामा नये, असे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना वाटत आहे.

पुन्हा एका तलावाचे लोकार्पण
संभाजीनगर येथील जलतरण तलावाच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम यांनी राजकीय शिमगा केल्याचे पाहायला मिळाले. तलावाचे काम अपूर्ण असल्यामुळे प्रशासनाला तो खुला करता येत नाही. मग राष्ट्रवादीने म्हणजेच अजित पवार यांनी अपूर्ण काम असलेल्या या तलावाचे उद्घाटन का केले? अपूर्ण कामांचे उद्घाटन करायचे आणि आता त्याच्या लोकार्पणाची वेळ आली की राष्ट्रवादी आंदोलन का करत आहे? असे अनेक प्रश्न शहरातील नागरिकांना पडले आहेत. राष्ट्रवादीचा ढोंगीपणा समोर आला असून आता भाजपकडून पिंपरीगावातील जलतरण तलावाचेही लवकरच लोकार्पण केले जाणार आहे. त्यावेळी राष्ट्रवादी असाच ढोंगीपणा करणार का? हे पाहावे लागणार आहे.