पिंपरीगावातील पाण्याची चिंता मिटली

0

पिंपरी-चिंचवड : प्रभाग क्रमांक 21 मधील कै. अनुसया वाघेरे शाळेच्या प्रांगणातील 20 दशलक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमीपूजन माजी महापौर व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर नितीन काळजे, नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, संगीता ताम्हाणे, पौर्णिमा सोनवणे, नगरसेवक विठ्ठल काटे, संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, पंकज भालेकर, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पाण्याच्या टाकीसाठी उषा वाघेरे यांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न केले होते.

नागरिकांची मोठी समस्या सुटणार
यावेळी संजोग वाघेरे म्हणाले की, प्रभागाची वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी पाण्याच्या टाकीची गरज भासत होती. ती गरज या 20 दशलक्ष लीटर क्षमतेच्या बांधण्यात येणार्‍या टाकीने कायमस्वरुपी भरून निघणार आहे. यामुळे येथील नागरिकांची मोठी समस्या मार्गी लागेल. महापौर नितीन काळजे म्हणाले की, संजोग वाघेरे हे त्यांच्या वडिलांचा सामाजिक वसा पुढे चालवत आहेत. त्यांच्या समाजकार्यात त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांचेही मोठे योगदान लाभत आहे. त्यामुळेच प्रभागात अनेक विकासकामे होत असल्याचे काळजे यांनी सांगितले.

पावणे दोन लाखांचा खर्च येणार
या पाण्याच्या टाकीचे काम वर्षभरात पूर्ण होणार असून, या कामासाठी 1 कोटी 75 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. तर वैभवनगर, पिंपरी गावठाण, संजय गांधीनगर, सुखवाणी परिसर, तपोवन मंदिर परिसर, संत कंवरराम परिसर या ठिकाणी जाणवत असलेली पाणीटंचाई या पाण्याच्या टाकीमुळे कायमची दूर होऊन इतरही परिसराला मुबलक व मोठ्या दाबाने पाणी मिळण्यास मदत होणार आहे.