पिंपरीतील ओढ्याला पूर

0

माळशिरस । पिंपरी गावात सायंकाळी जोरदार पाऊस झाल्याने गावाच्या ओढ्याला पूर आला आहे. यामुळे तीव्र पाणी टंचाईशी सामना करीत असलेल्या पिंपरी गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला आहे. सरपंच मीना शेंडकर यांनी शुक्रवारी जलपूजन केले. पाच वर्षांनंतर ओढ्याला पूर आल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्वी नाझरे धरणावरून पिंपरी, पांडेश्वर, जवळार्जुन, नाझरे या चार गावात मिळून नळ पाणी पुरवठा योजना करण्यात आली. काही वर्षे ही योजना सुरळीत चालली. मात्र, या योजनेला ग्रहण लागल्याने ही योजना बंद झाली. बाकीच्या गावांनी स्वंतत्र पाणी योजना केली. मात्र पिंपरी गावाला आजही स्वंतत्र पाणी योजना नाही. यासाठी 1 कोटी 5 लाख रुपये किंमतीचा नवीन आराखडा तयार करून शासनाकडे पाठवला आहे. मात्र, आजही योजना रखडली आहे. अनेक वर्ष गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागला. गावात पाणी योजना असल्याने वारंवार टँकरची मागणी करून ही शासनाकडून टँकर मिळत नव्हता. यामुळे पिंपरी गावाला पिण्याच्या पाण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत होती. सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर व ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मिळावा, पिंपरी गावाला कायम स्वरूपी स्वंतंत्र पाणी योजना करण्यात यावी, या मागणीसाठी पुरंदर तालुका पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय यांच्यावर हांडा मोर्चा नेऊन आंदोलन केले होते. मात्र, याचा काहीही उपयोग झाला नाही. गुरुवारी रात्री पिंपरी गावामध्ये जोरदार पाउस झाल्याने अनेक बंधारे भरले. यामुळे पाणी टंचाईचा प्रश्न कमी झाला आहे. या बंधार्‍यातील पाण्याचे जलपूजन पिंपरी गावाच्या सरपंच मीना शेंडकर, उपसरपंच विजय थेऊरकर यांनी केले. यावेळी कृषिभूषण महादेव शेंडकर, दिलीप हंबीर, अशोक लिंभोरे, विठ्ठल शेंडकर, संपत शेंडकर, सुरेखा शेंडकर, शीतल चव्हाण, सुजाता थेऊरकर, संध्या चव्हाण, कल्पना शेंडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.