पिंपरी-पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बो-हाडेवाडी, च-होली, रावेत, आकुर्डी येथे बांधण्यात येणा-या गृहप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत १३५ कोटी २७ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा असल्याचा आरोप करत या चारही प्रकल्पांच्या निविदांना त्वरीत स्थगिती देण्यात येऊन या संपूर्ण प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बो-हाडेवाडीत १ हजार २८८ निवासी गाळे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या निविदा रक्कम १२३ कोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समोर आहे. तसेच यापूर्वी च-होली येथील एक हजार ४४२ घरांच्या प्रकल्पांसाठी १३२ कोटी ५० लाखाला मान्यता देऊन कामाचे आदेश दिले आहेत. रावेत ९३४, आकुर्डी ५६८ येथे अनुक्रमे एकूण ४ हजार २३२ घरे उभारण्यात येणार आहेत. या कामासाठी ४१० कोटी 23 लाख इतक्या रकमेला मंजुरी घेण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने पेठ क्र.१२ येथे अशाच प्रकारचा गृहप्रकल्प होत आहे. त्याची प्रती सदनिका (कारपेट) २९.५ चौ.मी. या क्षेत्रफळाची आहे. तिचा चौरस फुटासाठी २ हजार ८४४ इतका दर निघत असून या योजनेच्या निविदेमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर (रस्ते, पाणीपुरवठा, मल नि:सारण, बहिर्गत विद्युतीकरण ) सोयी-सुविधांचा समावेश प्राधिकरणाच्या निविदेमध्ये आहे. तर, महापालिकेच्या प्रकल्पांच्या सदनिका (कारपेट) ३० चौ.मी. या क्षेत्रफळाच्या आहे. या निविदामध्ये (रस्ते, पाणीपुरवठा, मल नि:सारण, बहिर्गत विद्युतीकरण ) इन्फ्रास्ट्रक्चर सोयी-सुविधांचा समावेश नाही. मनपा प्रमाणे फक्त गाळ्यांची निविदा रक्कम काढली तर ती प्रती चौरस फुटासाठी २ हजार ४२ इतका दर येत आहे. प्राधिकरणाच्या दोन्ही निविदा ७.३९ टक्के व ७३९९ टक्के बिलो आल्या आहेत. तर, मनपाच्या निविदा आगाऊ दराने स्वीकारण्यात आलेल्या आहेत.