आरोपी सापडला, उसने पैसे देण्यास नकार दिल्याने टॉवेलने गळा आवळला
पिंपरी-चिंचवड : प्रदीप हिंगोरानी या साबण व्यापार्याची पिंपरीमध्ये 2 मेराजी हत्या करण्यात आली होती. ही हत्या कुणी व का केली याविषयी विविध तर्कवितर्क लढविले जात असतानाच आरोपीला पकडण्यात पोलिसांना येश आले आहे. या साबण व्यापार्याने उसने पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात तरुणाने व्यापार्याचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी सचिन येशोदास भालेराव (वय 33, रा. लिमयेवाडी, रूपवस्ती, सोलापूर) याला अटक करण्यात आली आहे. सुनील किशोरीलाल हिंगोरानी (वय 32, रा. सुखवानी एम्पायर, पिंपरी वाघेरे) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून प्रदीप उर्फ बाबू वीरुमल हिंगोरानी (वय 51, रा. मिनी मार्केट, पिंपरी) असे खून झालेल्या व्यापार्याचे नाव आहे.
कर्जाबाजारीपणामुळे केला खून
परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन भालेराव हा एका खासगी कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेत होता. त्यामध्ये त्याला बर्यापैकी पैसे मिळत होते. यामुळे त्याची जीवनशैली बदलली होती. मागील दीड वर्षांपूर्वी त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळणे बंद झाले. परिणामी मिळणारे पैसेदेखील बंद झाले. त्याला पैशांची गरज भासू लागली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत त्याच्यावर सुमारे दोन लाख रुपयांचे कर्ज झाले. ज्याच्याकडून कर्ज घेतले होते, तो इसम पैशांसाठी वारंवार तगादा लावत होता. दरम्यान, आरोपी सचिन आणि मयत प्रदीप यांची एका तिर्हाईत माणसामार्फत ओळख झाली होती.
हे देखील वाचा
सोलापूर मधून ताब्यात घेतले
आरोपी सचिन भालेराव याने प्रदीप हिंगोरानी यांना बुधवारी (दि. 2) त्यांच्या घरी जाऊन दोन लाख रुपये उसने मागितले. हे पैसे देण्यासाठी प्रदीप यांनी असमर्थता दर्शविली. पैसे असून देखील पैसे देत नाही, या रागातून सचिनने घरात पडलेल्या टॉवेलने प्रदीप यांचा गळा आवळला. यामध्ये प्रदीप यांचा मृत्यू झाला. यानंतर सचिनने घरातील कपाटात असलेली 38 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पळ काढला. पिंपरी पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तीन पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता त्यामध्ये एक संशयित आरोपी प्रदीप यांच्या घरापासून काही अंतरावर दुचाकी लावून प्रदीप यांच्या घरी आल्याचे समजले. त्यावरून दुचाकीच्या मालकाची चौकशी करण्यात आली. दुचाकीच्या मूळ मालकाने ही दुचाकी दीड वर्षांपूर्वी सचिनला विकली असून तो सोलापूर येथील राहणारा असल्याचे सांगितले. त्यावरून एक पथक सोलापूरला पाठवून सचिनला सोलापूर मधून ताब्यात घेण्यात आले. त्याला पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आणून कसून चौकशी केली असता, हा खून त्याने केले असल्याचे मान्य केले. याबाबत त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिस पथकाची यशस्वी कामगिरी
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मसाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास मुंढे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब अंतरकर, विठ्ठल बढे, सागर पाटील, पोलीस हवालदार खणसे, थेऊरकर, राजेंद्र भोसले, लकडे, जावेद पठाण, शाकीर जिनेडी, महादेव जावळे, पोलीस नाईक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल नितीन सूर्यवंशी, निलेश भागवत, भोते, कुसकर, देशमुख, दादा धस, पोलीस शिपाई डंगारे, मगर, थोपटे यांच्या पथकाने केली.