पिंपरी-चिंचवड : ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात तणावपूर्ण शांतता आहे. सर्वच मोक्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. दरम्यान, चिंचवड स्टेशन येथे एक पोलीस कर्मचारी आंदोलनाचे चित्रीकरण करत असताना जमावाने त्याला मारहाण केली.
यामध्ये तो किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. पिंपरी चौक परिसरातील दुकाने जमावाकडून जबरदस्तीने बंद करण्यात येत आहेत. काही ठिकाणी टायर जाळण्याचा प्रकार घडला आहे. तर पिंपरी येथे ग्रेड सेपरेटरमध्ये उभा असलेला टेम्पो फोडण्यात आला आहे. पिंपरी महापालिका मुख्यालयासमोर वाहनांची तोडफोड करण्यात आली.