तिहेरी तलाक विधेयकाविरोधात कुल जमाअती तंजीमचे आयोजन
पिंपरी-चिंचवड : लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आलेल्या ट्रिपल तलाक विधेयकाविरोधात कुल जमाअती तंजीम पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (दि. 31) मुस्लिम महिलांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये 23 हजार मुस्लिम महिला सहभाग घेणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत शुक्रवारी देण्यात आली. यावेळी मुफ्ती हुजैफा कासमी, मौलाना अतहर, महिला मोर्चा कृती समितीच्या नाजीमा शेख व पिंपरी-चिंचवड शहरातील कुल जमाअती तंजीमचे पदाधिकारी उपस्थित होते.
काळेवाडी ते पिंपरी मार्ग
लोकसभेत ट्रिपल तलाक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. हे विधेयक राज्यसभेत बहुमता अभावी अडकून पडले आहे. हे विधेयक म्हणजे सरकर मुस्लिम समाजाच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केला आहे. या विधेयका विरोधात देशभर मोर्चे काढले जात आहेत. आता पिंपरी-चिंचवडमधील महिला या विधेयका विरोधात शनिवारी मोर्चा काढणार आहेत. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास काळेवाडी येथील लतीफिया मस्जिद ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी इतपर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी रॅलीचे रुपांतर सभेत होणार आहे.