पिंपरीत ‘आप’चे मुख्य कार्यालय

0

पिंपरी-चिंचवड। आम आदमी पक्षाने मध्यवर्ती मुख्य जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. ज्येष्ठ शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी आप राष्ट्रीय संघटन बांधणीचे सदस्य अजिंक्य शिंदे, महाराष्ट्राचे प्रवक्ते मुकुंद किर्दत, चिंचवड विधानसभेचे निरीक्षक चेतन बेंद्रे, भोसरी विधानसभेचे निरीक्षक उमेश वर्‍हाडे उपस्थित होते.

पक्षाचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र राज्य प्रभारी पंकज गुप्ता महाराष्ट्र राज्याचा दौरा करत आहेत. त्यांनी कार्यकर्त्यांचे विभागनिहाय सभा घेऊन कार्यकर्त्यांच्या सहमतीने विधानसभा निहाय निरीक्षक नेमणूक केल्या आहेत. त्या निरीक्षकांकडे आपल्या क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करण्याची जबाबदारी सोपविली आहे. याच उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरासाठी मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे.

शहरातील पक्ष बांधणी व विविध संघटना तयार करण्यासंबंधी वर्‍हाडे व बेंद्रे यानी माहिती दिली. संपूर्ण राज्यात व देशात होणार्‍या विविध हालचाली व शेतकरी संदर्भात आपच्या देशव्यापी कार्यक्रमाबद्दल अजिंक्य शिंदे यांनी माहिती दिली. 10 सप्टेंबरला आपतर्फे महाराष्ट्रात शेतकरी-शेतमजूर हक्क परिषद होणार आहे. येत्या 14 ऑगस्टला राज्यभर चक्काजाम करणार असून 15 ऑगस्टला कुठल्याही मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होऊ देणार नाही, असे सांगितले. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असल्याने आप पुणे व पिंपरी-चिंचवडही 14 व 15 तारखेला रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होणार आहे, अशी माहिती दिली. सय्यद अय्याज यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत बोरसे यांनी आभार मानले.