पिंपरी-पिंपरीतील आरटीओच्या एका अधिकाऱ्याने परवाना देण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.
पिंपरीतील मोटार वाहन निरीक्षक सिद्धीराम पांढरे हे परवाना देण्यासाठी पैसे घेतात आणि यासाठी त्यांनी एक माणूस नेमला आहे, असा प्रहार संघटनेचा आरोप आहे. आरटीओचे मुख्याधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्यांनी याची दखल घेतली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.
शुक्रवारी दुपारी संघटनेचे स्थानिक नेते गौतम सुराडकर व अन्य कार्यकर्त्यांनी आरटीओ कार्यालयात प्रवेश केला. सिद्धीराम पांढरे हे एका चालकाची चाचणी घेत असताना प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गाठले. कार्यकर्त्यांनी वाहनात बसलेल्या पांढरे यांच्या तोंडाला काळे फासले. याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहे.