पिंपरीत उद्यापासून बसेस धावणार; सलून दुकाने सुरू

0

पिंपरी:- पिंपरी- चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असून, मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत शहरातील लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शहरातील सलूनची दुकाने सुरू करण्यात आली असून गुरुवार पासून सार्वजनिक बस वाहतूक सुरू होणार आहे.

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या 15 दिवसात 400 वर पोचली आहे. त्या मुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला भोसरी, रुपीनगर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. ते हळूहळू रेडझोन मधून बाहेर पडले. गेल्या काही दिवसांत चिंचवड मधील आनंद नगर झोपडपट्टी हॉटस्पॉट ठरत आहे. येथील रुग्णांना विलगीकरणासाठी अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न झाला असता त्याला काही लोकप्रतिनिधीं कडूनच विरोध होऊ लागला आहे. त्या मुळे प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.

एकीकडे शहरातील दैनंदिन जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र झोपडपट्टीतील रुग्णसंख्या वाढत आहे. त्या मुळे महानगरपालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीचा कसोटीचा क्षण येऊन ठेपला आहे. वाढत्या रुग्णाच्या पार्श्वभूमीवर बैठकीच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्यावर भर दिला जात आहे.

शहराच्या अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत संभाजी नगर, मोहन नगर, आनंद नगर, चिंचवड स्टेशन, आकुर्डी प्राधिकरण या भागाचा समावेश होतो. त्यात आनंद नगर मधील रुग्णसंखेने उच्चांक गाठला आहे.