पिंपरीत ‘ऑटोक्लस्टर’मध्ये ’राडा’!

0

पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या आमिषाने फसवणूक?

पिंपरी : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी टाटा कॅपिटल फायनान्सने आयोजित केलेल्या मेळाव्यात नागरिकांनी राडा घातला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना स्वस्तात घरकुल देण्याची योजना आहे, असे सांगून हजारो नागरिकांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले. ऑटोक्लस्टरमध्ये प्रदर्शनासाठी बोलावले. तेथे गेल्यानंतर अर्जासाठी एक हजार शुल्काची सक्ती केली. तसेच, 60 ते 70 लाख रुपयांपर्यंत घरे देणार असल्याचे सांगितले, त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रदर्शनस्थळी गोंधळ घातला. खुर्च्या, टेबलांची तोडफोड केली. पोलिसांनी धाव घेऊन तणावाची परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. दरम्यान, गैरसमाजातून नागरिकांनी तोडफोड केली असल्याचे टाटा फायनान्सने सांगितले आहे.

स्वस्त घरांच्या आमिषाने बोलाविले, महागडी घरे दाखविली!
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत टाटा फायनान्सने चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे मेळावा घेतला होता. पंतप्रधान आवास योजनेतील घरांबाबत कर्ज दिले जाणार होते. फायनान्सने त्यांच्याकडे यादीत नोंदी असलेल्या नागरिकांना या मेळाव्यात बोलविले होते. या ठिकाणी आल्यावर नागरिकांचा गैरसमज झाला. घरांच्या किमती जास्त आहेत. आम्हाला स्वस्तात घर देण्याचे सांगितले होते, असा आरोप करत नागरिकांनी स्टॉलची तोडफोड केली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. तोडफोडीनंतर स्टॉल बंद करण्यात आले. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश पाटील, पिंपरी ठाण्याचे पोलिस निरीक्षक मसाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व नागरिकांना शांत केले. दरम्यान, स्वस्तात घर दिले जाणार असल्याचे सांगून आम्हाला बोलाविले. त्याचे ऑनलाईन आम्ही अर्ज भरले आहेत. त्यासाठी 200 रुपये खर्च आला. इथे आल्यावर घरांच्या किमती जास्त सांगितल्या आहेत. आम्ही गोरगरीब कुटुंबातील असून, 60 ते 70 लाख रुपयांपर्यंतची घरे घेऊ शकत नाहीत. पंतप्रधान आवास योजनेचे नाव सांगून आमची फसवणूक केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. उपायुक्त गणेश शिंदे म्हणाले, पंतप्रधान आवास योजनेतील घरांबाबत कर्ज दिले जाणार होते. फायनान्सने त्यांच्याकडे यादीत नोंदी असलेल्या नागरिकांना या मेळाव्यात बोलविले होते. परंतु, नागरिकांच्या यामध्ये गैरसमज झाला. घरांच्या किमती जास्त आहेत. घरे मोफत मिळणार होती, अशी नागरिकांची भावना होती. त्यामुळे त्यांनी तोडफोड केली. टाटा फायनान्से मोफत घरे दिली जातील, असे सांगितले नव्हते.

नेमके प्रकरण आहे तरी काय?
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांनी विविध ठिकाणी अर्ज भरले. शासनाच्या योजनेअंतर्गत सवलतीच्या दरात हक्काचे घर मिळेल, या अपेक्षेने हजारो नागरिकांनी अर्ज भरून घेणार्‍यांना प्रतिसाद दिला. या योजनेअंतर्गत 2.67 लाख सबसिडी मिळणार, असेही सांगण्यात आले होते. साडेआठ लाखाचे घर सहा लाखात मिळू शकेल. या आशेने नागरिकांनी अर्ज सादर केले. घरकुल योजनेसाठी अर्ज सादर केलेल्यांची माहिती संकलित करून खासगी वित्त संस्थेने बांधकाम व्यवसायिकांना हाताशी धरून गृहप्रकल्पाचे प्रदर्शन आयोजित केले. सुरूवातीला 7 जानेवारीला हे प्रदर्शन घेणार असल्याचे जाहीर केले. त्यावेळी शेकडो अर्जदार ऑटोक्लस्टरजवळ येऊन गेले. त्यांना प्रदर्शन पुढे ढकलले आहे, लवकरच एसएमएसव्दारे पुढची तारीख कळविली जाईल, असे सांगितले. 20 आणि 21 जानेवारी ही प्रदर्शनाची तारीख कळविल्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून राज्याच्या कानाकोपर्‍यातून लोकांनी गर्दी केली. प्रदर्शनस्थळी नागरिकांना सोडण्यात आले तेव्हा प्रवेश करताच, त्यांना एक हजार रुपये शुल्क भरण्याची सक्ती केली. तसेच त्यांना परवडेल अशा स्वरूपाच्या गृहप्रकल्पाची माहिती दिली जात नव्हती, असा आरोपही नागरिकांनी केला आहे.

पोलिसांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला
खासगी बांधकाम व्यवसायिकांचे मोठे प्रकल्प त्यातील 40 ते 50 लाखांच्या सदनिका याबद्दल येथे माहिती दिली जात होती. सामान्य नागरिक एवढ्या मोठ्या रकमेच्या सदनिका खरेदी करू शकणार नाहीत. शासकीय योजनेचा लाभ मिळणार म्हणून या प्रदर्शनास आलो. मात्र या ठिकाणी फसवणूक केली जात असल्याचे लक्षात येताच त्यांनी संयोजकांकडे तक्रार केली. मात्र कोणीही त्यांची समजूत काढण्यास तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रदर्शनस्थळी खुर्च्या, टेबल यांची तोडफोड केली. दालने तोडून टाकली. काचा फोडल्या. हाताला येईल ती वस्तू नेण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती मिळताच परिमंडल तीनचे सहाय्यक पोलिस आयु्कत सतिश पाटील, तसेच पोलिस निरिक्षक (गुन्हे) मसाजी काळे व अन्य पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गर्दी पागंगवली. गोंधळ होताच, आयोजकांनी तेथून पळ काढला होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सकाळी प्रदर्शन सुरू होताच, गोंधळ झाल्याने प्रदर्शनस्थळी खुर्च्या, टेबल आणि अन्य साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दृश्य पहावयास मिळाले होते.