जळगाव। पाचोरा तालुक्यातील पिंपरी येथे लहान मुलांच्या भांडणाचा वाद मोठ्यांपर्यंत पोहाचल्यानंतर जोरदार हाणमारी झाली होती. यात चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यातील एकाला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या जखमीचा आज मंगळवारी सायंकाळी 4.45 वाजता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात आक्रोश केला. दरम्यान, मारहाण करणार्यांना अटक करावी अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली. पिंपरी येथे 5 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता लहान मुलांमध्ये किरकोळ भांडण झाले. मात्र, भांडण लहान मुलांच्या कुटूंबियांपर्यंत पाहोचल्यानंतर दोन्ही पठाण कुटूंबियांमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून जोरदार वाद झाला. यात हाणमारी होवून युनुस गयास पठाण, इलियास गयास पठाण, सुलताणा बी इलियास पठाण, गयास हुसेन पठाण या चार जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर चौघांवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, युनुस पठाण याला लाकडी दांड्याने मारहाण करून उचलून फेकल्याने त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याना शनिवारी 8 एप्रिलला जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यानंतर मारहाण करणार्यांविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
युनुस पठाण याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने त्याला जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतर आज मंगळवारी युनुस याचा उपचार घेत असतांना सायंकाळी 4.45 वाजता मृत्यू झाला. युनुस याच्या मृत्यू बातमी नातेवाईकांना कळताच त्यांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला. यानंतर मारहाण करणारे युनुस बिसमिल्ला पठाण, जुम्मा बिसमिल्ला पठाण, छोटु बिसमिल्ला पठाण, शाहरुख जुम्मा पठाण, मोहसिन जुम्मा पठाण, इरफान जुम्मा पठाण यांनी मुलाचा खून केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत त्यांना अटक करण्याची मागणी केली. तसेच या लोकांनी युनुस व आमला बेदम मारहाण केल्याचेही युनुस याच्या कुटूंबियांनी सांगितले. तसेच त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.