पिंपरीत डॉक्टरसह तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

0

पिंपरी ः मेडीकलसाठी दिलेली डिपॉझिटची रक्कम मागण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरला, भावाला आणि त्यांच्या वडिलांना दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना पिंपरीगावातील अयुश्री हॉस्पीटलमध्ये नुकतीच घडली. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अनुपम नंदलाल अग्रवाल (वय 34, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विलास वसंत डांगे (वय 42), संदीप राजू शिंदे (वय 26, दोघे रा. रहाटणी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अग्रवाल यांनी आरोपीला मेडीकल टाकण्यासाठी डिपॉझिट म्हणून काही रक्कम दिली होती. अनुपम व त्यांचा भाऊ अमित आणि वडिल नंदलाल हे क्लिनीकमध्ये बसले होते. आरोपी त्याठिकाणी आले असता फिर्यादी अनुपम यांनी त्यांना पैसे मागितले. मात्र, पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपींनी अनुपम यांना शिवीगाळ करत थांब, तुझ्याकडे पाहतोच असे म्हणून काचेची प्रेष्ठम डोक्यात मारली. हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांना सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या वडिलांना आणि भावालाही आरोपींनी मारहाण केली.