पुणे : पिंपरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अज्ञातांनी कुटुंबावर जीवघेणा हल्ल्या करण्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पती, पत्नी जखमी झाले असून, पत्नीच्या डाव्या हाताची चार बोटे तुटली आहेत. पिंपरीतील देहूरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायडूनगर ते माळवाडी परिसरात रात्री सव्वाबाराच्या सुमारास ही घटना घडली.
महेंद्र काळोखे आणि राणी काळोखे असे जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. तर त्यांचा मुलगा सुखरुप आहे. दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काळोखे कुटुंब चारचाकी वाहनाने निघाले असताना त्याचवेळी पत्ता विचारण्यासाठी बाईकवरून आलेल्या दोघांनी त्यांची गाडी थांबवली. त्यानंतर हल्लेखोरांनी तलवार आणि काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून हल्लेखोर अद्याप फरार आहेत. काळोखे कुटुंब हे माळवाडी येथील रहिवासी आहेत.