पिंपरीत पीएमपीएमलचे विभागीय कार्यालय

0

वेळेत बस न सुटणे, खेपा रद्द होणे यासह विविध तक्रारींसाठी जावे लागत होते पुण्यात
पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती सभेत ठराव

पिंपरी-चिंचवड : शहरात धावणार्‍या पीएमपीएमएल बस संचालनाचे नियंत्रण पुण्यातील कार्यालयातून होते. पीएमपीएमएलच्या अनेक बस रद्द होतात. नियोजित वेळेत बस न सुटणे, बसच्या खेपा रद्द होणे तसेच पीएमपीएलबाबतच्या विविध तक्रारी करण्यासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे शहरातील पीएमपीएमपीएल संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पिंपरीत पीएमपीएमलचे विभागीय कार्यालय सुरु करण्याचा ठराव स्थायी समितीत करण्यात आला आहे.

तक्रारीच्या निवारणासाठी निर्णय
पीएमपीएमएलला दरमहा अग्रीम स्वरुपात संचलन तुट व सवलतीच्या पासपोटी सात कोटी 50 रुपये अदा करण्यात आले. सभेत पीएमपीएमएलच्या सेवेबाबत चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड शहरात कमी बस धावतात. गाड्यांचे खराब होण्याचे प्रमाण अधिक आहे. नियोजित वेळेत बस न सुटणे, बसच्या खेपा रद्द होणे अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जातात. परंतु, त्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पुण्यात जावे लागते. त्यामुळे तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी आणि बस संचालनयाचे काम अधिक प्रभावीपणे होण्यासाठी पूर्वीप्रमाणे पीएमपीएमएलचे महामंडळ मुख्यालय क्रमांक दोनचे कार्यालय पिंपरीत सुरु करावे.

लोखंडे सभागृहात कार्यालय
पिंपरीतील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात कार्यालय सुरु करण्यात यावे. त्याच्या नियंत्रणासाठी सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे पीएमपीएमएल प्रशासन आणि महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक यांच्यात समन्वय साधण्यासाठी या कार्यालयात पीएमपीएमएलचे कर्मचारी संजय कुटे यांची नेमणूक करण्यात यावी, असे याबाबतच्या ठरावात म्हटले आहे.

कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलच्या किती बस धावतात. किती खराब झाल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती घेण्यासाठी पुढील आठवड्यात चिंचवड येथील अ‍ॅटो क्लस्टर सभागृहात एक कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेत पीएमपीएमएलच्या अध्यक्षांकडून सर्व माहिती घेतली जाणार असल्याचे, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.