पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथील टपाल कार्यालयामध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) रोजी उद्घाटन करण्यात आले. सुरू करण्यात आलेल्या या कार्यालयामुळे पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना पासपोर्ट काढणे सोयीस्कर होणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार गौतम चाबुकस्वार, महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे, पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पोस्ट मास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर, कोल्हापूर उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, पोस्ट विभागाच्या अधिकारी सुमित्रा अयोध्या, अभिजित बनसोडे, नगरसेवक सचिन भोसले, मीनल यादव, प्रमोद कुटे, अमित गावडे, मुरलीधर ढगे, संपत पवार, गजानन चिंचवडे, रवी नामदे, भगवान वाल्हेकर, मारुती भापकर, संजय काटे उपस्थित होते.
नागरिकांची गैरसोय दूर होणार
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर झपाट्याने वाढत आहे. शहराबरोबरच हिंजवडी, चाकण, तळेगाव या आय.टी. क्षेत्राचादेखील विस्तार होत आहे. शहराजवळ वास्तव्यास असणार्या नागरिकांनाही या नवीन पासपोर्ट सेवा केंद्राचा फायदा होणार आहे. पुणे येथे मुंढवामध्ये पासपोर्ट कार्यालय सहा जिल्ह्यांसाठी आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर या जिल्ह्यातून नवीन पासपोर्ट काढण्यासाठी नागरिक येत असल्याने मोठा ताण व विलंब या पासपोर्ट कार्यालयावर पडत होता व वेळही जास्त लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन पासपोर्ट सेवा केंद्र झाल्याने नागरिकांना याचा लाभ होणार आहे, असे बारणे यांनी सांगितले.
उपक्रमास शुभेच्छा
पुणे विभागाचे पासपोर्ट विभाग अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रास्ताविक केले. महापौर नितीन काळजे यांनी शहरात नवीन पासपोर्ट सेवा केंद्र खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातून सुरू झाल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. आमदार गौतम चाबुकस्वार यांनीही या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतीन पोटे यांनी केले. तर क्षेत्रीय पोस्ट ऑफिस अधिकारी गणेश सावळेश्वरकर व जे.डी. वैशंपायन यांनी आभार मानले.