पिंपरीत महापौर बदलाचे वारे

0

संतोष लोंढे म्हणाले मीच होणार महापौर!
सव्वा वर्षापूर्वी नेत्यांनी आश्‍वासन दिल्याचा केला दावा

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे महापौर, उपमहापौर व सभागृह नेते बदलाचे वारे सत्ताधारी भाजपमध्ये जोरदार वाहू लागले आहे. मूळ ओबीसी असलेले व प्रथम वर्षी महापौरपदासाठी डावलेले भोसरीतील नगरसेवक संतोष लोंढे यांनी महापौरपदासाठी दावा केला आहे. आपण मूळ ओबीसी असून आपल्याला सव्वा वर्षानंतर महापौर करण्याचे आश्‍वासन नेत्यांनी दिले होते. त्यामुळे मी महापौर होणारच असा विश्‍वास संतोष लोंढे यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला. तसेच आपल्याला ओबीसी संघटनांनी पाठिंबा दिल्याचेही त्यांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा महापौर, उपमहापौर, सभागृह नेता बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

पंचवार्षिकमध्ये सर्वांना पदाचे धोरण
महापालिकेतील कारभार्‍यांनी सर्व नगरसेवकांना पंचवार्षिकमध्ये एक तरी पद देण्याचे धोरण निश्‍चित केले आहे. पालिकेच्या आर्थिक चाव्या हातात असणार्‍या स्थायी समितीमध्ये दोन वर्षांऐवजी नगरसेवकांना एकाच वर्षाचा कालावधी देण्यात आला. महापौर नितीन काळजे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ 12 जूनला संपला आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौरांसह सभागृह नेते बदलावेत असा सूर भाजपमधून आळवला जाऊ लागला आहे. तसेच इच्छुकांकडून आपणच महापौर पदासाठी कसे योग्य आहोत, हे सांगितले जाऊ लागले आहे. यामुळे महापौर बदलाच्या हालचालींना वेग येणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील परदेश दौर्‍यावरुन परतले आहेत. त्यामुळे बदलाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

महापौर कोणाचा? लांडगे की जगतापांचा!
महापौरपदानंतर स्थायी समिती सभापतीपदासाठीही डावलण्यात आलेले आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शशिकांत कदम आणि नामदेव ढाके यांची नावे चर्चेत आहेत. महापौरपद चिंचवडकडे जाणार असल्याचे निश्‍चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापौरपदासाठी काटे, ढाके व कदम या तिघांमध्ये मोठी चुरस असणार आहे. हे तिघेही आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक मानले जातात. महापौर चिंचवडचा झाल्यास राहुल जाधव किंवा संतोष लोंढे या दोघांपैकी एकाची सभागृहनेतेपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर, पिंपरी मतदार संघातील शीतल शिंदे यांना उपमहापौरपद दिले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

पद न दिल्यास वेगळे पाऊल : लोंढे
महापौरपदासाठी इच्छुक असलेले संतोष लोंढे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाने आपल्याला दिलेला शब्द पाळावा, अशी मागणी केली आहे. लोंढे म्हणाले, सव्वा वर्षानंतर महापौर बदलण्याचे ठरले होते. तसेच महापौरपद अडीच वर्षांसाठी भोसरी मतदार संघातील नगरसेवकांकडे ठेवण्याचे देखील निश्‍चित झाले होते. त्यामुळे आता विद्यमान महापौरांचा सव्वा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पक्षाने मला सव्वा वर्षानंतर महापौर करण्याचा शब्द दिला आहे. तसेच महापौरपद हे ओबीसीसाठी राखीव आहे. मी मूळ ओबीसीच आहे. तसेच माझी दुसरी टर्म असून पत्नी एक टर्म नगरसेविका होती. मला ओबीसी संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा आहे. त्यामुळे पक्ष माझा महापौरपदासाठी विचार करेल. पहिल्या वर्षीच पद नाकारल्यानंतर मी पालकमंत्र्यांकडे राजीनामा देऊ केला होता. आता पद न दिल्यास वेगळे पाऊल उचलण्यात येईल, असा इशाराही दिला