पिंपरी-चिंचवड : पिंपरी येथे सराईत गुन्हेगार संतोष कुरावत याच्यावर तीनजणांनी कोयत्याने हल्ला केल्याची आणि गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संतोष हा अमोल घुले यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. ही घटना पिंपरीच्या साधू वासवानी उद्यानाजवळील एका हॉटेलमध्ये शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. पिंपरी कॅम्प ही मोठी बाजारपेठ असल्याने घटनेने सगळीकडे धावपळ उडाली.
कोयत्याने हल्ला, पाच फैरी झाडल्या
प्राथमिक माहितीनुसार, संतोष अशोक कुरावत (वय 33) हा अन्य दोन मित्रांसोबत आज दुपारी पिंपरीच्या साधू वासवानी उद्यानाजवळील ओम शिव हॉटेलमध्ये चहा पीत होता. त्याचवेळी त्याठिकाणी आलेल्या सात ते आठ जणांनी संतोष याच्यावर कोयत्याने हल्ला केला. संतोष आणि त्याच्या तीन मित्रांनी या हल्ल्यातून वाचण्यासाठी हॉटेलमधील वस्तू हल्लेखोरांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. हॉटेलमधील टेबल, दूध हल्लेखोरांच्या अंगावर फेकले. मात्र हल्लेखोरांपैकी एकाने संतोषच्या दिशेने पिस्तुलातून चार ते पाच फैरी झाडल्या. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या हल्ल्यामध्ये संतोष गंभीर याच्या डोक्याला एक गोळी घासून गेली तर दुसरी त्याच्या पायात लागली आहे. त्याच्यावर चिंचवडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एक पिस्तूल आणि दोन कोयते ताब्यात घेण्यात आले.
जखमीने लढविली होती निवडणूक
संतोष हा अमोल घुले यांच्या खून प्रकरणातील आरोपी आहे. संतोष याने काळेवाडी प्रभाग क्र. 22 अ मधून अपक्ष निवडणूक लढवली होती. संतोष याच्यावर खुनासह तीन गुन्हे दाखल आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस आयुक्त उत्तर विभाग शशिकांत शिंदे, उपयुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके यांच्यासह पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.