नवमहाराष्ट्र विद्यालयात 1965 साली पतंगराव कदम यांची पहिली नियुक्ती
लेखक श्रीकांत चौगुले यांच्या ‘गाव ते महानगर’ पुस्तकात आढळला उल्लेख
पिंपरी-चिंचवड : पिंपरी गावामध्ये रयत शिक्षण संस्थेने नवमहाराष्ट्र विद्यालय सुरु केले. तो 1960-70 च्या दशकाचा काळ होता. शाळेला इमारत नसल्याने पिंपरी गावातील भैरवनाथाच्या कौलारू मंदिरात शाळा भरत असे. 1965 च्या दरम्यान या शाळेत बदली शिक्षक म्हणून पतंगराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पिंपरी गावचे पहिले शिक्षक म्हणून देखील ओळखले जाते. पिंपरी गावचा पहिला शिक्षक पुढे जाऊन शिक्षण मंत्री व त्यापुढे जाऊन शिक्षण महर्षी बनला.
शाळा रयत शिक्षण संस्थेची
पतंगराव कदम यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील सोनसळ गावात 1944 साली झाला. घरची गरिबी आणि पाठीशी कसलाही आधार नसताना ऐन विशीत पुण्यासारख्या ठिकाणी तेही सदाशिव पेठेत विद्यापीठ स्थापन करण्याचे धाडस पतंगराव कदम यांनी केले. ते त्यांच्या गावातील पहिला मेट्रिक झालेला विद्यार्थी होते. मॅट्रिकनंतर रयत शिक्षण संस्थेत कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत त्यांच्या शिक्षणाचा पुढील प्रवास सुरु झाला. त्याच काळात पिंपरी गावात रयत शिक्षण संस्थेने नवमहाराष्ट्र विद्यालय नावाने नवीन शाळा सुरु केली.
अर्धवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती
या शाळेमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून पतंगराव कदम यांची नियुक्ती करण्यात आली. ग्रामीण भाग असल्याने गावात वीज पोहोचलेली नव्हती. ते कंदिलाच्या प्रकाशात विद्यार्थ्यांना जमा करत, त्यांना शिकवत व त्यांचा अभ्यास घेत. शिक्षक म्हणून काम करतानाच तेंव्हाच्या पुणे विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. पुढे त्यांनी सहकार मंत्री, उद्योग मंत्री अशी अनेक महत्वाची खाती सांभाळली मात्र शिक्षण मंत्री हेच खाते विशेषत्वाने पिंपरीकरांच्या लक्षात राहिले. कारण पिंपरी गावचा पहिला शिक्षक शिक्षणमंत्री झाला होता.
शाळेचा मोठा विस्तार
याबाबत लेखक श्रीकांत चौगुले यांनी त्यांच्या ’गाव ते महानगर’ या पुस्तकात उल्लेख केलेला आढळून येतो. आज पिंपरीमधील नवमहाराष्ट्र विद्यालयाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून आता बारावी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. पतंगराव कदम यांनी सुरु केलेल्या भारती विद्यापीठाचा देखील वटवृक्ष झाला असून विद्यापीठात आज तब्बल 180 शाळा-महाविद्यालये आहेत. त्यातून सुमारे दीड लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.