पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणारे मावळातील पवना धरण झपाट्याने खाली होत असल्याने शहरवासीयांवर पाणी कपातीचे सावट दाटले आहे. गेल्या पावसाळ्यात हे धरण तुडूंब भरले होते. तरीही महाराष्ट्र दिनापासून शहरात दहा टक्के पाणीकपात होण्याची शक्यता असून, त्याला पालिकेच्या जबाबदार सूत्रांनी दुजोरा दिला आहे. गेल्या पाच वर्षात 35 टक्के वाढलेली लोकसंख्या आणि त्या तुलनेत पाणी कमी उपलब्धता तसेच यावर्षी लवकरच सुरू होऊन कडक झालेला उन्हाळा आणि त्यामुळे पाण्याचे वाढलेले बाष्पीभवन यामुळे ही पाणीकपात नाईलाजाने करावी लागणार असल्याची माहिती पालिका सूत्राने दिली. शहराला दररोज 465 ते 470 एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी लागत असून, त्या मुळे पवना धरणातील पाणी पावसाळ्यापर्यंत कसे पुरवायचे असा प्रश्न महापालिका व जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकलेला आहे.
जुलैअखेर पाणी पुरवावे लागणार
पवना धरणात सध्या 142 टक्के पाणीसाठा आहे. तो शहराला जुलैअखेर पुरेल असा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. मात्र, पाण्याचा गैरवापर, त्याबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा, वाढते बाष्पीभवन व येत्या पावसाळ्यावरील ’अल निनो’चा प्रभाव यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पाणीबचतीचे महत्व पटवून देण्यासाठी व पाण्याची काटकसर करीत योग्य तेवढाच वापर व्हावा या उद्देशातून ही पाणीकपात केली जाणार आहे. दोन वर्षापूर्वीच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे गेल्यावर्षी दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आली होती. सुदैवाने गेल्यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे पवना भरले. त्यामुळे यावेळच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नाही, असे वाटत होते. पण यावेळी उन्हाळा लवकरच जाणवू लागला असून, त्यामुळे पाणीवापर वाढला आहे. दुसरीकडे उन्हाच्या दाहकतेमुळे पाण्याचे बाष्पीभवनही वाढू लागले आहे.
वाढत्या लोकसंख्येने मुलभूत सुविधांवर ताण
पिंपरी-चिंचवड शहराला पुरवठा होणार्या पाण्यामध्ये गेल्या पाच वर्षात एका लीटरच्याही पाणीस्त्रोताची वाढ झालेली नाही. बाष्पीभवनाबरोबरच पाण्याची गळती आणि चोरीही रोखणारा बंद जलवाहिनी प्रकल्प तडीस नेण्याची नितांत गरज आहे. त्याजोडीने आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्याच्या योजनेलाही गती द्यावी लागणार आहे. तुलनेने शुध्द हवा-पाण्यामुळे उद्योगनगरीत निवासाकडे सगळ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळे दरवर्षी शहराची लोकसंख्या सात टक्यांनी वाढत आहे. त्यामुळेच 2011 मध्ये लोकसंख्या आता 22 लाख झाली आहे. परिणामी, मुलभूत सुविधांवर मोठा ताण पडू लागला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या लोकसंख्येला पाणी कमी पडू लागले आहे.
शहराची पाणीपुरवठा स्थिती
* 470 : एमएलडी (दशलक्ष लीटर) शहराचा दररोजचा पाणीपुरवठा
* 150 : लीटर प्रतिदिन दरडोई (प्रतिमाणसी) दिले जाणारे पाणी
* 135 लीटर प्रतिदिेन दरडोई पाण्याची कायदेशीर तरतूद