पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने धरणात अवघा 80 टक्के पाणीसाठा शिल्लक
सर्व प्रमुख पदाधिकार्यांची आज निगडीत बैठक!
पिंपरी चिंचवड : यंदा पुरेसा पाऊस झाल्यामुळे पवना धरण वेळेतच 100 टक्के भरले होते. परंतू गेल्या दोन-तीन महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने धरणात अवघा 80 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणी कपातीसंदर्भात धोरण निश्चित करण्यासाठी मंगळवार दि. 27 रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांची सेक्टर 23, जलशुध्दीकरण केंद्र निगडी येथे तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. यंदा हिवाळ्यापासूनच पाणी कपातीचे संकट शहरवासियांवर ओढावले आहे.
गळतीमुळे शहरात पाणीबाणी…
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण यंदा 100 टक्के भरले होते. परंतू गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली. दरम्यान स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दखल घेत शहरात एक प्रकारची पाणीबाणी जाहिर केली. पाणी गळतीमुळेच ही टंचाई होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान शहरात होत असलेला पाण्याचा अपव्यय आणि पाणीचोरी रोखण्याचे सक्त आदेश त्यांनी अधिकार्यांना दिले होते.
गटनेत्यांमध्ये होणार चर्चा…
दरम्यान, आजच्या घडीला पवना धरणात 80 टक्के पाणीसाठा उरला आहे. भविष्यातील पाणी संकट आणखी गडद होऊ नये, म्हणून महापालिका प्रशासनाने प्रमुख पदाधिकारी तसेच गटनेत्यांची बैठक बोलविली आहे. मंगळवार दि. 27 रोजी निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्र येथे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला महापौर राहुल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, उपमहापौर सचिन चिंचवडे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच पाणी पुरवठा विभागाचे सर्व अधिकार्यांना बोलविण्यात आले आहे.