पिंपरी-चिंचवडचे पाणी पेटले!

0

पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी पुरवठ्याची चोहीकडे बोंबाबोंब सुरु असून, शहरवासीयांत संतापाची लाट उसळली आहे. अपुरा व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे शहरवासीय स्थानिक नगरसेवकांना धारेवर धरत असल्याने शहराचे पाणी चांगलेच पेटले आहे. पाणी पुरवठ्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत, आठवड्यातून दोनदा तरी पाणी पुरवठा विस्कळीत होत असून, अनेक भागात तर गेल्या काही दिवसांपासून पाणी आलेलेच नाही. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासन एकवेळ पुरेसे पाणी देऊ शकत नसेल तर दिवसाआड तरी सुरुळीत पाणी पुरवठा करावा, अशी मागणीही नगरसेवकांनी केली. दरम्यान, एप्रिलअखेरपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यानंतर मात्र दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. खासदार श्रीरंग बारणे यांनीही महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देऊन, याप्रश्‍नी नाराजी व्यक्त केली. शहरात पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे. नियोजनाचा अभाव व पाणी पुरवठ्याचे चुकीचे नियोजन यामुळेच पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे नमूद करत खा. बारणे यांनी महापालिका प्रशासनास चांगलेच फटकारले आहे.

आणखी दोन दिवस विस्कळीत पाणीपुरवठा
पवना धरणालगतच्या जलविद्युत केंद्रातून रोज दुपारनंतर बाराशे घनफूट प्रतिसेकंद (क्युसेक) वेगाने पाणी महापालिकेसाठी सोडण्यात येते. जलविद्युत केंद्रातील यंत्रणेत रविवारी सायंकाळी बिघाड झाल्याने, तेथून सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात आले. त्याचा परिणाम होऊन रावेत बंधार्‍याजवळील पाणी पातळी कमी झाली. त्यामुळे सोमवारपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पवना जलविद्युत केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीचे काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या प्रमाणावर झाला आहे. जलसंपदा विभागातर्फे पुरेसे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील शहरात गेले दोन दिवस विस्कळित झालेला पाणीपुरवठा आणखी दोन दिवस काही भागांत विस्कळीत होण्याची शक्यता आहे, असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

नगरसेवकांकडून प्रशासन धारेवर
नगरसेवक राजू मिसाळ यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. प्राधिकरण परिसरात पुरेशा दाब्याने पाणी येत नाही. त्यातच पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून प्राधिकरणात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. नदीतील रावेत बंधारा येथील पाणी पातळी कमी झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे सांगितले जाते. परंतु, ही पातळी कधीपर्यंत राहणार आहे. पाणीपुरवठ्याबाबत आयुक्तांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या, वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पालिकेने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. वैशाली काळभोर म्हणाल्या, पाणीपुरवठा हा कोणत्या राजकीय पक्षाचा प्रश्‍न नसून हा शहराचा प्रश्‍न आहे. त्याकडे सर्वांनी गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. तो सोडविण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.

मेपासून दिवसाआड पाणी : शहर अभियंता
यावर खुलासा करताना पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर म्हणाले, पवना जलविद्युत केंद्रातील स्पीड कंट्रोलिंग करणारा गव्हर्नर अनियंत्रित झाला. त्याच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरु आहे. पवना नदीतील रावेत बंधारा येथील पाणी पातळी वरती येत नाही. बंधार्‍याचे गेट उघडले आहेत. पाणी साठवून ठेवण्याची पालिकेकडे व्यवस्था नाही. त्यासाठी बंद जलवाहिनी योजना मार्गी लावणे हा एकमेव मार्ग आहे. एप्रिलपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता नाही. एप्रिलनंतर दिवसाड पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार आहे. यापूर्वी धरणातून महिन्याला 8 टक्के पाणी कमी होत होते. आता 11 टक्के पाणी कमी होत आहे. पालिका आरक्षित कोट्यापेक्षा जास्त पाणीउपसा करत आहे. त्यामुळे एप्रिलअखेरला दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल.

खा. बारणे यांचे आयुक्तांना पत्र
पाणीपट्टी दरवाढीस सर्व राजकीय पक्षांनी विरोध केला आहे, त्यामुळे भाजपने मनमानी कारभार थांबवावा, अशी टीका खा. बारणे यांनी केली आहे. तसेच, त्यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र देत, महापालिका 450 एमएलडीपेक्षा जास्त पाणी दररोज उचलते. परंतु, प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत तेवढे पाणी पोहोचत नाही. 38 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी गळती होत असून, त्याला अनधिकृत नळजोड, नियोजनाचा अभाव व पाणी पुरवठ्याचे चुकीचे नियोजन कारणीभूत असल्याची टीका खा. बारणे यांनी केली आहे.