पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव विजयी

0

पिंपरी-पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली आहे. त्यांना 80 मते मिळाली. तर, राष्ट्रवादीचे विनोद नढे यांचा पराभव झाला असून त्यांना 33 मते मिळाली. सत्ताधारी भाजपचे 3 नगरसेवक तर, राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक अनुपस्थित राहिले. तर, अपक्ष पाच नगरसेवक आणि मनसेचे सचिन चिखले यांनी भाजपला मतदान केले. दरम्यान, शिवसेना तटस्थ राहिली.

महापौर, उपमहापौर यांची निवड करण्यासाठी आज शनिवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधरण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पीएमपीएमएलच्या संचालक नयना गुंडे यांनी कामकाज पाहत आहेत. सभेचे कामकाज सुरू होताच पीठासीन अधिकारी नयना गुंडे यांनी महापौरपदाच्या अर्जांची छाननी केली. त्यानंतर अर्ज माघारी घेण्यासाठी 15 मिनिटे वेळ दिली. या मुदतीत कोणीही माघार घेतली नाही. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया राबवत मतदान घेण्यात आले. त्यामध्ये भाजपचे राहुल जाधव यांचा विजय झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू बनसोडे, डबू आसवानी आणि नगरसेविका सुलक्षणा धर अनुपस्थित होते. दरम्यान, महापौरपदी डावलले गेल्यामुळे भाजपचे शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित राहिले. तर, कोटूंबिक कारणास्तव भाजपचे तुषार कामठे अनुपस्थित राहिले आहेत.

दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहिली. आता उपमहापौरपदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उपमहापौरपदासाठी भाजपचे सचिन चिंचवडे आणि राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांच्यात लढत आहे.