अद्याप कार्यालय, कुशल मनुष्यबळही मिळाले नाही
पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटी योजनेत सहभागी झालेल्या पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी संदर्भातील कामात मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा दिसून येत आहे. कुशल मनुष्यबळ नाही आणि शासनाकडून मिळणार्या जवळपास 194 कोटींच्या निधीची महापालिकेला अजूनही प्रतीक्षा आहे. ‘स्मार्ट’ सिटीसाठी मध्यवर्ती कार्यालय अजून मिळू शकलेले नाही. अशा परिस्थितीत, यासंदर्भातील प्रगतीचा आढावा घेणार्या संचालक मंडळाच्या तिसर्या बैठकीचे नियोजन सुरू झाले असून, प्रगती फक्त कागदावरच दिसून येते. ‘स्मार्ट सिटी’साठी विशेष उद्देश वहन (स्पेशल पर्पज व्हेईकल – एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. उशिरानेच कामकाज सुरू झालेल्या या कंपनीसाठी कुशल मनुष्यबळ अजूनही उपलब्ध झालेले नाही. मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय असावे, यादृष्टीने सुरू असलेला कार्यालयाचा शोध थांबलेला नाही. अजमेरा कॉलनीत एका जागेची निवड करण्यात आली, मात्र ती जागा अडचणीची असल्याचे सांगण्यात येते. अशा प्रतिकूल परिस्थितीत स्मार्ट सिटीची वाटचाल सुरू आहे.
फेब्रुवारीत आता तिसरी बैठक
‘स्मार्ट सिटी’साठी पिंपरी-चिंचवडची 18 ऑगस्ट 2017 ला वर्णी लागली. आतापर्यंत पालिका मुख्यालयात स्मार्ट सिटीच्या दोन बैठका झाल्या आहेत. तिसर्या बैठकीसाठी पालिका प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था दिसून येते. स्मार्ट सिटीसाठी शासनाकडून अद्यापही निधी उपलब्ध झालेला नाही. अजूनही पालिकेच्या खर्चानेच कामकाज सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन वर्षांचा एकत्रित असा 194 कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध होईल, असा विश्वास पालिका अधिकार्यांना वाटतो आहे.
.. ते दोन कोटीही अद्याप मिळाले नाही!
आतापर्यंत पालिकेच्या खर्चानेच स्मार्ट सिटीचे कामकाज सुरू आहे. स्मार्ट सिटीतून बाहेर पडलेल्या नव्या मुंबई महापालिकेकडून पिंपरी-पालिकेला दोन कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहेत, तेही मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून नियोजन करा. पाणी, वाहतूक, पदपथ, वाहनतळ, सांडपाणी निचरा यासारखे विषय प्राधान्याने घ्या, तसेच इतर शहरांनी न केलेली कामे पिंपरीने करावीत, अशा सूचना संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. मात्र त्यादृष्टीने अपेक्षित कार्यवाही होताना दिसत नाही.