पिंपरी-चिंचवडमधील गरीब वस्त्यांसाठी फिरता दवाखाना

0

अल्प दरात मिळणार डॉक्टरांकडून तपासणी, सल्ला व औषधे

पिंपरी-चिंचवड । शहरातील गरीब वस्त्यांतील आरोग्याच्या समस्यांवर बजाज समूहाच्या जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेतर्फे (जेबीजीव्हीएस) फिरता दवाखाना सुरु करण्यात आला आहे. अल्प दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा दवाखाना दुर्गानगर, आंबेडकरनगर, अजंठानगर, लालटोपीनगर, वेताळनगर, विद्यानगर, रामनगर व ओटा स्कीम अशा भागांत नियमितपणे फिरणार आहे. विविध भागांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

सुसज्ज दवाखाना
या उपक्रमाबद्दल जेबीजीव्हीएसचे सचिव पार्थसारथी मुखर्जी म्हणाले, अनेक वर्षे खेड व मावळ तालुक्यांच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवणारा फिरता दवाखाना आता शहरात दाखल झाला आहे. येथील गरीब वस्त्यांत दर आठवड्याला मंगळवार ते शनिवार हा दवाखाना जाणार आहे.

दवाखान्यासोबत प्रत्येक वेळी एक तज्ज्ञ डॉक्टर व परिचारिका असेल. तसेच प्रथमोपचार पेटी, मुलभूत औषधे, रक्त दाब, रक्त शर्करा व नाडी तपासणीची सुविधा आणि अन्य वैद्यकीय साधनांनी हा दवाखाना सुसज्ज आहे. अत्यल्प शुल्कात गोळ्या, औषधे, इंजेक्शन व अन्य वैद्यकीय सेवा यामध्ये पुरवल्या जातील. रोग प्रतिबंध व स्वच्छता याबद्दल जागृती केली जाईल. काही गंभीर आजार आढळल्यास अशा लोकांना मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात येईल.