प्रत्येक महिन्याला सुमारे सहा पॅन पूर्ण करण्याचे लक्ष्य
पिंपरी-चिंचवड – पिंपरीतील कासारवाडी येथील कास्टिंग यार्डमध्ये स्वतंत्र सेगमेंट तयार केले जातात. खराळवाडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम जोरात सुरू आहे. ते सेगमेंट मेट्रो मार्गावर बसवण्यात येतात. एकूण 50 पॅन पूर्ण करण्यासाठी लागणारे सेगमेंट कास्टिंग यार्डमध्ये तयार आहेत. यामुळे मेट्रोच्या कामाला आणखी वेग येणार आहे, असा दावा पुणे मेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्हाडे यांनी केला. पुणे मेट्रोच्या फुगेवाडी कार्यालयात आयोजित संवादात बिर्हाडे बोलत होते. ते म्हणाले की, खराळवाडी येथे पॅनसेगमेंट उभारणीचे काम सुरू असून पाच पॅन पूर्ण करण्यात आले आहेत. कासारवाडी येथील कास्टिंग यार्डमध्ये सेंगमेंट निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. सध्या 431 सेगमेंट तयार झाले आहेत. 50 पॅन पूर्ण करण्यासाठी हे सेगमेंट पुरतील. खराळवाडीपासून पहिला लॉन्चर बसविण्यात आला आहे. 15 मे दरम्यान आणखी एक लॉन्चर बसविण्यात येणार आहे. यामुळे आतापेक्षा दुप्पट वेगात मेट्रोचे काम होईल. प्रत्येक महिन्याला सुमारे सहा पॅन पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
खराळवाडी ते पिंपरी-चिंचवड महापालिका दरम्यान काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्यामध्ये बॅरीगेट लावण्यात आले आहेत. कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ मेट्रो रेल्वे स्थानकाच्या बाजूला वळणार आहे. त्या वळणाच्या पिलरचे काम आठवडाभरात सुरू होणार आहे. भोसरी, सांगवी आणि पुणे शहराकडून येणारी वाहने त्या रस्त्यावरून जात असल्याने या मार्गावर काम सुरू करताना वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मेट्रोचे पिलर येणार आहेत. त्यासाठी वाहतूक विभागाची परवानगी घेण्याचे काम सुरू आहे.
वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे काम प्रगतिपथावर
वल्लभनगर मेट्रो स्थानकाचे कामही वेगात सुरू आहे. मेट्रो स्थानकासाठी एकूण 48 फाऊंडेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी 20 फाऊंडेशन पूर्ण झाले आहेत. तर 10 सेंटर फाऊंडेशन उभे करण्यात येणार आहेत. त्यापैकी 8 सेंटर फाऊंडेशनचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो स्थानकासाठी लागणारे गटर किवळे येथील कास्टिंग यार्डमध्ये तयार करण्यात येत आहेत, अशी माहिती पुणे मेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिर्हाडे यांनी दिली.