पिंपरी-चिंचवड । स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका व बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुप खडकी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 11 व 12 ऑगस्ट रोजी भारतीय लष्कराचे ‘नो युवर आर्मी’ हे प्रदर्शन व प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. एच. ए. मैदान, पिंपरी येथे होणार्या या प्रदर्शनाचे उद्घाटन 11 रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर काळजे असतील. प्रदर्शनात भारतीय लष्कर युद्ध सामग्री पाहता येणार आहे. त्यात इन्फट्री, आर्म्ड, इंजिनिअर्स, सिग्नल्स, एअर डिफेन्स, मेकॅनाईज्ड या यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
12 ऑगस्टला सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ दरम्यान, भारतीय लष्कराचा बँड, विविध मार्शल आर्टस् (महाराष्ट्रातील मलखांब, पंजाबमधील गटका, दक्षिण आशियातील प्रसिद्ध असलेली काली कला, जिमनॅस्टिक, ब्रास बँड, बॉडी बिल्डींग) यांची प्रात्यक्षिके सादर होणार आहेत. 200 लष्करी जवान ही प्रात्यक्षिके सादर करतील. या प्रदर्शनाच्या माध्यमातून युवकांना भारतीय लष्करात सामिल होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार असून, नागरिकांनी या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.