पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लुचा उद्रेक, वर्षातील पहिला बळी!

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लुचा उद्रेक झाल्याचे आढळून आले असून, वर्षातील पहिलाच स्वाईनबळी महापौरांच्या प्रभागात गेला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन हादरून गेले आहे. चर्‍होली भागातील 17 वर्षीय मुलाला स्वाईन फ्लु झाल्याने 20 जानेवारीरोजी त्याला महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 24 जानेवारीला त्याला स्वाईन फ्लुचे निदान झाले. अतिदक्षता कक्षात त्याच्यावर उपचार सुरु असतानाच मंगळवारी त्याची प्राणज्योत मालवली. शहरात सद्या विषम हवामान असून, त्यामुळे स्वाईनच्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना हाती घेण्याची मागणी पुढे आली आहे.

468 संशयितांना टॅमिफ्लुचे वाटप
चर्‍होली येथे राहणार्‍या 17 वर्षीय मुलाला स्वाईन फ्लुची लक्षणे आढळल्यावरून वायसीएममध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्याच दिवशी त्याला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले होते. हा मुलगा महापौर नितीन काळजे यांच्या प्रभागातील असल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुला व्यतिरिक्त आणखी एका रुग्णालाही स्वाईन फ्लुचे निदान झालेले आहे. त्याच्यावरही अतिदक्षता कक्षात उपचार सुरु आहे. तर अन्य एका रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले आहे. जानेवारीपासून शहराचे हवामान विषाणूस पोषक झाले असून, 99 हजार 34 संशयितांची महापालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. पैकी, 468 जणांना या रोगाची लागण होण्याची भीती पाहाता, त्यांना टॅमिफ्लुच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. तसेच, शहरातील विविध 12 स्वाईन फ्लुग्रस्त रुग्णावरही विविध रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाच्यावतीने ‘जनशक्ति’स देण्यात आली आहे.

गतवर्षी गेले 61 बळी
गतवर्षीही शहरात स्वाईन फ्लुचा उद्रेक झाल्याचे आढळून आले होते. जानेवारी ते डिसेंबर 2017 या वर्षात एकूण 867 रुग्णांना स्वाईन फ्लुची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यातील 413 रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाली होती. वर्षभरात 61 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर 352 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले होते. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी अशी स्वाईन फ्लुची लक्षणे असून, ही लक्षणे आढळून आल्यास तातडीने महापालिकेच्या रुग्णालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.