शहरातील नवोदित खेळाडूंना मिळणार प्रोत्साहन – क्रीडा सभापती तुषार हिंगे
पिंपरी । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीतर्फे 17 खेळांच्या शालेय महापौर चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामुळे शहरातून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळून राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळणार आहे, अशी माहिती कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी सभागृहात क्रीडा सभापती तुषार हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी सहायक आयुक्त अण्णा बोदडे, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्टूवार, संजय घुबे, प्रशांत पाटील, उपअभियंता तसेच, क्रीडाधिकारी रज्जाक पानसरे, प्रशासन अधिकारी सुनंदा गवळी, शिक्षणाधिकारी पराग मुंढे आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सभापती तुषार हिंगे म्हणाले की, महापालिकेच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय, राज्य, जिल्हास्तरावरील विविध खेळांच्या महापौर चषक स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्या खेळामध्ये शहरातील खेळांडूचा अत्यल्प समावेश असतो. राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांवर होणारा खर्च हा शहराबाहेरील खेळाडूंवर होत असतो. हा खर्च शहरातील शालेय विद्यार्थी-खेळाडूंवर होण्याच्या दृष्टीने महापौर चषक शालेयस्तर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आवश्यक आहे. त्यानूसार फुटबॉल, कबड्डी, बुद्धीबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटींग, कुस्ती, हॉकी, थ्रोबॉल, योगा क्रिकेट, बास्केटबॉल, हॅण्डबॉल, अॅथलेटिक्स व कराटे या 17 खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
या स्पर्धा डिसेंबर 2019 व जानेवारी 2020 या दोन महिन्यात पालिका व खासगी शाळाच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धेकरिता संबंधित मैदानावार सर्व प्रकारच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. खेळाडूंसाठी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर बसविण्यात येणार आहेत. स्पर्धा आयोजानापुर्वी पालिका व खासगी शाळेचे शिक्षक, क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनांचे प्रतिनिधींंची सभा घेतली जाणार आहे. स्पर्धेसाठी येणार्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्याचा सूचना क्रीडा विभागास दिल्या आहेत.
या महापौर चषक शालेयस्तर क्रीडा स्पर्धेत महापालिका शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी खेळाडू सहभागी व्हावेत, म्हणून विशेष प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी क्रीडाधिकारी, 2 क्रीडा पर्यवेक्षक, 1 शिक्षण विभाग पर्यवेक्षक, 2 क्रीडा शिक्षक, 2 सीटीओचे अधिकारी यांची एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. शहरातील पालिका व खासगी शाळेस भेट देऊन स्पर्धेत सहभागी होण्यसाठी ही समिती प्रवृत्त करणार आहे, असेही हिंगे यांनी यावेळी सांगितले.
००००००००