निगडी : येथील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात गुरुवारी (दि. 17) ’कॉम्प्युटींग, कम्युनिकेशन कंट्रोल अॅण्ड ऑटोमेशन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आयईईई पुणे विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या परिषदेत भारतासह रशिया, युके, जपान, जर्मनी, ऑस्ट्रलिया येथील विद्यार्थ्यांनी 1040 पेक्षा जास्त शोधनिबंध सादरीकरणासाठी दिले आहेत.
यांची उपस्थिती लाभणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, सीडॅक मुंबईच्या सहसंचालिका डॉ. पद्मजा जोशी, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, संस्थेचे सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापकीय संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाटे आदी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी परिषदेचा समारोप
या परिषदेचा समारोप शुक्रवारी (दि. 18) रोजी सायंकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. ’टेक्नोव्हिजन इंडिया 2035’ प्रकल्पांतर्गत ही आंतरराष्ट्रीय परिषद एकूण 60 सत्रांमध्ये घेण्यात येणार आहे. त्यापैकी शिक्षण, औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 12 समांतर सत्र सादर करण्यात येणार आहेत.