पिंपरी व चिंचवड ही दोन वेगवेगळी गावे होती. आता दळणवळण आणि भौगोलिकदृष्ट्या ही गावे एकत्र झालीत, हे परिवर्तनच आहे. सन1954 मध्ये पिंपरीमध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एचए) हा कारखाना सुरू झाला. या कारखान्याने शहराच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यानंतर या परिसरात कारखान्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे कामगारांची संख्याही वाढली. पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी या भागातील लोकसंख्या या औद्योगिकीकरणांमुळे झपाट्याने वाढली. त्यामुळे या गावांच्या ग्रामपंचायती विसर्जित करून नगरपालिका स्थापन करण्याची मागणी पुढे आली. पुढे 4 मार्च 1970 रोजी तशी पहिली नगरपालिका स्थापन झाली. त्यानंतरही शहराच्या लोकसंख्या वाढीच्या वेगाला झपाटाच होता. त्यामुळे सांगवी, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर, पिंपळे-निलख, रहाटणी, थेरगाव, वाकड या गावांचा समावेश करून 11 ऑक्टोबर 1982 रोजी महापालिका अस्तित्वात आली. 1997 मध्ये या महापालिकेत तळवडे, चिखली, मोशी, डुडुळवाडी, चोवीसावाडी, चर्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, पुनावळे, रावेत, ताथवडे या गावांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे शहराचा परिघ विस्तारला. पिंपरी-चिंचवड म्हणजे अनेक खेड्यांचे मिळून बनलेले शहर असे का म्हटले जाते? त्याला हे कारण आहे.
भोसरीच्या नेतृत्वात शहराचा विकास!
चिंचवड -भोसरी ही राज्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीत साडेपाच हजारांपेक्षा जास्त उद्योग कार्यरत आहेत. एसकेएफ, टाटा मोटर्स, फिलिप्स, सॅण्डविक, अल्फा लावल, अॅटलस यांसारख्या मोठ्या कंपन्यांना या शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरल्यात. त्यामुळे शहराचा झपाट्याने विकास होऊ शकला. राज्यभरातून खास करून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागातून आलेला कामगारवर्ग या शहरात स्थायिक झाला. पुढे हिंजवडी, तळवडे या भागातील आयटीपार्कमुळे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या सर्वोच्च संधी येथे निर्माण झाल्यात. आज मोठे आयटी हब येथे दिसून येते. खंबीर राजकीय नेतृत्वाने कल्पकतेने या शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी खमकी भूमिका घेतली. परिणामी, खेड्यांच्या मिळून बनलेल्या या शहराचे स्मार्ट सिटीत रूपांतर होऊ शकले. एखाद्या शहराचे नागरीकरण झपाट्याने झाले म्हणजे, आनुषंगिक सुविधाही निर्माण होत जातात. या शहराबाबतीतही तसेच झाले. शहर विस्तारित झाले, त्याचे महत्त्व वाढले तसे येथे सर्व सोयींनीयुक्त रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, मॉल्स या सुविधा निर्माण झाल्यात. ज्या पुणे शहराच्या सावलीत हे शहर वाढले. त्या पुणे शहरापेक्षाही अनेक चांगल्या सुविधा आणि सोयी पिंपरी-चिंचवडमध्ये आहेत. स्पाईन सिटी, इंद्रायणीनगर या भागाचा विकास तर अनेकांना आश्चर्यचकित करतो. शहरातील भोसरी हे एक असे गाव आहे, जे पैलवानांसाठी नावाजलेले आहे. भोसरीचे नाते लाल-काळ्या मातीशी आहे, अशी एक आख्यायिका चर्चेत असते की भोजराज्याच्या यानगरीत जो कोणी रोजीरोटीसाठी आला, त्याला या परिसरात वणवण भटकावे लागणार नाही. या आख्यायिकेमागचे कारण काय माहीत नाही. परंतु, खरेच या भागात रोजीरोटीसाठी आलेल्या माणसाला वणवण भटकावे लागण्याची दुर्दैवी वेळ अजून तरी कुणावर आलेली नाही. कामासाठी आलेला माणूस उपाशी राहिला असेही कधी झाले नाही! गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व भोसरी परिसरानेच केले. सध्याही या शहराचे खरे नेतृत्व भोसरीकडेच आहे. महापौर, आमदार अशी बहुतांशपदे या भागाला मिळालेली आहेत.
वेगवान शहरीकरणामुळे चिंता वाढली…
पिंपरी-चिंचवडचे शहरीकरण वेगाने होत आहे. शहराचे परिवर्तनही झपाट्याने होत आहेत. त्याचमुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या शहराची रोजगारनिर्मितीची क्षमता आता घटू लागली आहे. शहरातून वाहणार्या नद्यांनी प्रदूषणाची कमाल पातळी गाठली. नद्या अक्षरशः गटारगंगा झाल्यात. शिक्षणाच्या सोयी अपुर्या वाटू लागल्या आहेत, वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कचरा व्यवस्थापनाबाबत तर बोलायलाच नको, या शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज आहे. कारण गुन्हेगारी प्रचंड म्हणजे प्रचंड बोकाळलेली आहे. ट्रॅफिक सिग्नल अनेक ठिकाणी नावालाच उरलेत. हे सिग्नल जर सिंक्रोनाइज्ड केले तर रस्त्यावरील प्रदूषण कमी होऊ शकेल. रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी करायची असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी आणि स्वस्त करावी लागणार आहे. शहरातील नागरिक कर भरण्यास टाळाटाळ करत नाहीत. औद्योगिक क्षेत्रातूनही चांगला कर महसूल महापालिकेला मिळतो. मग् शहर सुंदर, स्वच्छ आणि सोयी-सुविधांनी पूर्ण करण्यासाठी अडचण येते कुठे? हा प्रश्न आहे. खरे तर या शहराच्या शहरीकरणाचा वेग 2011च्या जनगणनेनुसार 30 टक्क्यांच्या आसपास दिसून येतो. पुढील काही वर्षांत तो 60 टक्क्यांवर जायला बसला. अशा परिस्थितीत शहरीकरणाची प्रक्रिया थांबवता येणारी नाही. जगभरातील शहरे अफाट वाढत आहे. अगदी नजीकच पाहायचे झाले तर दिल्ली, मुंबई, कोलकाताच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवडचे शहरीकरण वाढत आहे. पुण्यापेक्षाही या शहराच्या शहरीकरणाची वाढ मोठी आहे. त्यामुळे शहर विकासाची धोरणे आता बदलावी लागणार असून, नवनिर्माणाचा वेग वाढवावा लागणार आहे.
नव्या भागांनाही सांभाळून घ्यावे लागणार!
ग्रेड सेपरेटर्स हे उड्डाणपुलाच्या तीनपट महाग असताना उड्डाणपूल उभारण्याऐवजी राजकीय नेते व सत्ताधारी मग ते राज्यातील असोत की महापालिकेतील उड्डाणपूल उभारण्याऐवजी ग्रेड सेपरेटर्स उभारणीला का महत्त्व देत आहेत, हे अनाकलनीय आहे. शहरात झोपडपट्ट्या वाढत आहेत. त्यांचा वेगही उदंड आहे. त्यामुळे शहराचा बाह्य भाग सोडला तर अंतर्गत भाग प्रचंड गलिच्छ दिसतो. या झोपडपट्ट्यांचे पुनवर्सन करणे आणि नव्याने त्या निर्माण होणार नाहीत, याची तजवीज करणे त्यासाठी धोरणे आखणे व सक्तीने त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची समस्या आहे, ती म्हणजे शहराचा विकास करताना उपनगरांचाही विकास व्हायला हवा. खरे तर घरपट्टी व इतर करांच्या माध्यमातून जमा होणार्या पैशातून फार विकास करता येईल, अशी अपेक्षा नाही. विकासासाठी शहराची मदार उद्यापही अनुदान व सरकारच्या मदतीवरच अवलंबून आहे हे सत्य आहे. या शहराच्या सुदैवाने महापालिकेत ज्यांची सत्ता असते त्यांची राज्यातही सत्ता असते. केंद्रातही त्यांचीच सत्ता असते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांहून शहरासाठी पैसा चांगला मिळतो. विकासाच्या निधीची चणचण भासत नाही. तथापि, नको तेथे पैसे उधळले गेल्याचेही प्रामुख्याने दिसून येते. रहदारीचे प्रश्न निर्माण झाले आहेत हे खरे असले, तरी त्यासाठी जे स्कायवॉक उभारले आहेत, ते वापरले जातात का? ते जर वापरले जात नसतील तरा पैसा विनाकारण खर्च का केला जातो, यावर सत्ताधारी विचार करताना दिसत नाहीत. शिरुर लोकसभा मतदारसंघात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरीचा थोडा भाग येतो तसेच चाकण, राजगुरुनगर, शिरुरपर्यंत या शहराचा विस्तार पोहोचत आहे. या भागात लोकसंख्या वाढीचा दर मोठा आहे. उद्या हा भागही पिंपरी-चिंचवडमध्ये समाविष्ट झाला, तर फारसे नवल राहणार नाही. त्यामुळे विकासाचे नियोजन करताना या भागाचाही विचार करावाच लागणार आहे. खेड्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या या शहरात आज काय नाही? प्रशस्त रस्ते, वैशिष्ट्यपूर्ण उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, बीआरटीएसमुळे सुखकर झालेली दळणवळण व्यवस्था, भव्य उद्याने, बर्ड व्हॅली, जलतरण तलाव, व्यायामशाळा, समृद्ध ग्रंथालये, मुलेमुलींसाठी स्वतंत्र आयटीआय अन् ऑटोक्लस्टरसारख्या सुविधांमुळे कामगारनगरी असलेले हे शहर खर्या अर्थाने स्मार्ट सिटी झाले आहे.
भव्य आणि सुंदर उद्याने ही या शहराची खरी ओळख ठरली. शहरात एकूण 157 उद्याने असून, ती साडेतीनशे एकरवर साकारली आहेत. शाहूनगर, दुर्गादेवी टेकडी, भक्ती-शक्ती उद्यान, पिंपळे गुरव येथील डायनासोर पार्क, संभाजीनगरमधील साई गार्डन, सांगवीचे शिवसृष्टी उद्यान, कासारवाडीतील संगीत कारंजे उद्यान, गुलाबपुष्प उद्यान, भोसरीचे सहलकेंद्र, थेरगावातील बोटक्लब उद्यान पाहण्यासारखे आहे. खाणीचा बर्ड व्हॅलीसाठी केलेला सुंदर उपयोग, संत बहिणीबाई सर्पोद्यान यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडलेली पाहायला मिळते. 41 रस्त्यांचे सुशोभीकरण आणि वाहतूक बेटे विकसित केली आहेत.
विकासकामे करताना अधिक दूरदृष्टिकोन हवा!
गेल्या दोन दशकांतील हा बदल, विकास आहे. ग्रामपंचायत ते महापालिका असा या शहराचा झालेला प्रवास तसा झपाट्यानेच म्हणावा लागेल. तरीही या प्रवासात प्रशासकीय कारभाराचा अपेक्षित वेग महापालिकेने कायम ठेवला. प्रशासकीय कामांच्या 24 इमारती, 104 शाळा, 28 दवाखाने, स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक रुग्णालयासारखे मोठे रुग्णालय, 8 जलशुद्धीकरण केंद्रे, 35 जलकुंभ, 849 व्यापारी गाळे, 49 सांस्कृतिक केंद्रे, 27 व्यापारी संकुले अशा पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. अद्यापही विकासाचे अनेक टप्पे गाठायचे आहेत. क्रीडापटूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील. कुस्ती प्रशिक्षण केंद्रही उभारावे लागेल, शहराची 18 लाखांच्या घरातील लोकसंख्या पाहता, शहर विकासाच्या अनेक मुद्द्यांवर नियोजन करावे लागणार आहे. शहराचे परिवर्तन झाले, अगदी झपाट्याने झाले. परंतु, शहरीकरणाचा वेगही अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. नवे शहर स्मार्ट सिटी म्हणून पुढे येत आहे. त्यासाठी विकासाचे नियोजन करताना सत्ताधारीवर्गाला अधिक दूरदृष्टिकोन ठेवून जागृत राहावे लागणार आहे.
पुरुषोत्तम सांगळे – 8087861982