पिंपरी चिंचवड परिवहन कार्यालयातील अधिकार्‍यांचा भ्रष्ट कारभार

0

कारवाईची परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे मागणी

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्ट कारभाराला पिंपरी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी चव्हाट्यावर आणले आहे. या भ्रष्ट कारभाराला त्वरीत आळा घालून संबंधित परिवहन कार्यालयातील दोषी अधिकारी, कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांची पिळवणूक होत असल्याची माहिती पिंपरी युवा सेनेच्या पदाधिकार्‍यांना मिळाली. या तक्रारीवरून युवासैनिकांनी कार्यालयातील कामकाजाची माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली.

बोगस कागदपत्रांची जोडणी….
बॅच बिल्ला, वाहन परमिट, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन चाचणी, वाहन निरिक्षक आदी मुद्यांची माहिती प्राप्त झाली. ही कागदपत्रे मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांची पुर्तता केली जात असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आहे. बॅच बिल्ला मिळवण्यासाठी अपुरी कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबधीत अधिकारी रजेवर असतात त्याच दिवशी त्यांच्या सहीने दाखले वितरित केले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फिटनेस प्रमाणपत्राच्या वाहन चाचणीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे बंधनकारक आहे. मात्र, त्याचे कोणतेही रेकॉर्ड सध्या उपलब्ध नाहीत. ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

खातेनिहाय चौकशी व्हावी…

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील दोषी अधिकारी आणि कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी. दोषींवर कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे, अशी मागणी पिंपरी विधानसभा युवासैनिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना दिले आहे. पिंपरी विधानसभा युवती सेनाधिकारी प्रतिक्षा घुले, विभाग संघटक निलेश हाके, अ‍ॅड. अजित बोराडे, सनी कड, ओंकार जगदाळे, राहुल राठोड यांनी रावते यांना समक्ष भेटून निवेदन दिले.