पिंपरी-चिंचवड परिसरात अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड

0

पिंपरी :- येथील नेहरूनगर, विठ्ठल नगर, संतोषी माता चौक, क्रांती चौक परिसरामध्ये रस्त्याच्या बाजूला उभी केलेली वाहनांची तोडफोड करत १० ते १२ जणांच्या टोळक्याने हातात शस्त्र घेऊन धुडगूस घातल्याची घटना मंगळवारी (दि. 15) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. यामध्ये तीन जणांवर वार देखील केले.

गणेश रामदास नेहरकर (वय 39, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि संभाजी भगवान म्हस्के (वय 36, रा. नेहरूनगर, पिंपरी) या दोघांना टोळक्याने मारहाण करत त्यांच्यावर शस्त्राने वार केले. दरम्यान, नेहरकर कामावरून घरी जात होते त्यावेळी टोळक्याने नेहरकर यांना अडवून बेदम मारहाण करत त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच म्हस्के यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. दुचाकी, रिक्षा आणि कार अशा एकूण 10-12 वाहनांच्या काचा फोडल्या. यामध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विठ्ठलनगर परिसरासह संतोषी माता चौक, क्रांती चौक या भागातही टोळक्याने धुडगूस घातला. गणेश नेहरकर यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी झालेल्या नेहरकर आणि म्हस्के यांना यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विठ्ठलनगर परिसरात दररोज दिवसभर गजबज सुरु असते. या घटनेमुळे मात्र परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.