पिंपरी-चिंचवड, पुणे गारठणार; तापमान 11 अंशापर्यंत घसरणार!

0

हवामान खात्याचा अंदाज; पिंपरी-चिंचवड, पुण्याचे होणार महाबळवेश्‍वर

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहर या आठवड्यात गारठणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. सद्या पुणे शहराचे तापमान सरासरी 13.5 अंशसेल्सिअस इतके नोंदविले जात असून, पिंपरी-चिंचवड शहराचे तापमानही घसरले आहेत. त्यामुळे चालू आठवडा कडकडीत थंडीचा सामना करण्यात घालवावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून बोचरी थंडी जाणवत असून, रविवारी तर किमान तापमान 13 अंशसेल्सिअस इतके नोंदविण्यात आले होते. चालू आठवड्यात ते 11 अंशसेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.

महाबळवेश्‍वरपेक्षाही कमी तापमान राहणार
हवामान खात्याच्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चालू आठवड्यात महाबळवेश्‍वरचे तापमान सरासरी 12 अंशसेल्सिअस इतके राहण्याची शक्यता असून, त्याहीपेक्षा पुणे शहराचे तापमान कमी असणार आहे. डिसेंबर 18 ते डिसेंबर 20 या कालावधीत पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान सरासरी 12 अंशसेल्सिअस तर 21 ते 23 डिसेंबर या कालावधीत या दोन्हीही शहराचे तापमान 13 अंशसेल्सिअस इतके राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. म्हणजे, या आठवड्यात पुणे शहर हे राज्यातील सर्वाधिक थंड शहर राहण्याचा अंदाज आहे. या आठवड्यात सरासरी किमान तापमान 11 तर कमाल तापमान 28 ते 29 अंशसेल्सिअस इतके राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आल्याने शहरवासीयांना आता उबदार कपडे बाहेर काढावे लागणार आहेत.

पुणे, पिंपरी-चिंचवडकरांना भरणार हुडहुडी
मागील आठवड्यात पुणेसह जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शहराचे तापमान घसरले असले तरी विषम हवामान निर्माण झाले आहे. तथापि, रविवारपासून हवामान पुन्हा बदलले असून, सोमवारपासून गारठा वाढला आहे. रविवारी सर्वाधिक कमी तापमानाची नोंद नाशिक येथे 12.6 अंशसेल्सिअस इतकी झाली होती. तर पुण्याचे तापमान 13.5 अंशसेल्सिअस इतके होते. त्यामुळे नजीकच्या काळात पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना चांगलीच हुडहुडी भरणार आहे.