पिंपरी-चिंचवड, पुण्यात विद्यार्थ्यांना लवकरच हेल्मेटसक्ती!

0

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विविध शैक्षणिक संस्थेत दुचाकी घेऊन शिक्षणासाठी जाणार्‍या विद्यार्थ्यांना हेल्मेट सक्ती करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबत त्यांनी वाहतूक शाखेला सूचित केले असून, दोन्हीही शहरातील सर्व शैक्षणिक संस्थांना जावून विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांना मार्गदर्शन करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे. त्यानुसार, लवकरच वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती पोलिस विभागातर्फे देण्यात आली. पुणे अन् पिंपरी-चिंचवड शहरात एकाचवेळी अशाप्रकारची मोहीम हाती घेतली जाणार असून, त्यानंतरही हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणार्‍या विद्यार्थी, विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

यापूर्वीही राबविली होती हेल्मेटसक्ती मोहीम
याबाबत माहिती देताना रश्मी शुक्ला यांनी सांगितले, की अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी दुचाकी चालविताना हेल्मेट वापरत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ते स्वतःचाच जीव धोक्यात घालत आहेत. या विद्यार्थ्यांत हेल्मेट वापरण्याबाबत प्रथम प्रबोधन केले जाणार असून, त्यानंतरही हेल्मेट न वापरता दुचाकी चालविताना आढळून आल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, यासाठी महाविद्यालयीन प्रशासन व शैक्षणिक संस्थांनीच प्रबोधन करावे, अशी आमची इच्छा आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्थांना सूचित केले जाणार आहे, असेही शुक्ला यांनी सांगितले. यापूर्वी 2012-13 मध्ये शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष मोहीम राबवून महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यांत हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी काही महाविद्यालयांनी विशेष उपक्रमदेखील हाती घेतले होते. परंतु, त्यानंतर काहीच प्रगती दिसून आली नाही, अशी माहिती शहर वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली. आता पुन्हा एकवेळ अशाप्रकारची मोहीम हाती घेतली जात आहे.

तरुणाईचे सर्वाधिक रस्ते अपघात
वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास सहा लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी आहेत. त्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्वतःचे दुचाकी वाहन आहे. त्याद्वारेच ते शाळा, महाविद्यालयांत जाणे-येणे करतात. कोणत्याही महाविद्यालयांच्या पार्किंगकडे जरी नजर टाकली तरी किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी दुचाकी घेऊन रस्त्यावर धावत असतील, याचा पुरेसा अंदाज येतो. विविध रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणे किंवा जखमी होण्यामध्येही विद्यार्थिनी वा विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. जवळपास 20 टक्के रस्तेअपघात हे 25-34 वयोगटातील वाहनधारकांचे होतात. त्यात सर्वाधिक संख्या ही विद्यार्थीवर्गाची आहे, अशी माहितीही वाहतूक शाखेतर्फे देण्यात आली. वाहतूक शाखेच्या माहितीनुसार, वर्षाकाठी जवळपास 400 जण शहरातील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. त्यातही सर्वाधिक संख्या ही विद्यार्थ्यांची आहे.

काय म्हणते आकडेवारी….
– 6,00,000 : शहरात विद्यार्थी, विद्यार्थिनी
– 20% : रस्ते अपघातात 25-34 वयोगटातील तरुण
– 400 : रस्ते अपघातात दरवर्षी मृत्यू