मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन; एकनाथ पवार यांची माहिती
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथील कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम नोव्हेंबर अखेरीपर्यत पूर्ण केले जाणार आहे. पुढील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदर कार्यालयाचे उद्घाटन केले जाणार आहे, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.12) सांगितले.
ऑटो क्लस्टर येेथून चालतो कारभार..
पिंपरी-चिंचवड शहराचे स्वतंत्र कार्यालय 15 ऑगस्ट 2018 ला कार्यान्वित झाले आहे. तीन महिने उलटूनही अद्याप, आयुक्तालयासाठी स्वतंत्र कार्यालय तयार न झालेले नाही. त्यामुळे आयुक्तालयाचा तात्पुरता कारभार चिंचवड ऑटो क्लस्टर येथून चालविला जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी व कामकाजामध्ये अनेक गैरसोय निर्माण होत आहे. पालिकेच्या प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेच्या इमारतीमध्ये आयुक्तालय तयार करण्याचे काम सुरू आहे.
25 नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश…
महापालिकेच्या वतीने स्थापत्य व फर्निचरचे काम सुरू आहे. या कामाची सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी सोमवारी पाहणी केली. सदर काम अंतिम टप्पात असून, ते 25 नोव्हेंबरपर्यंत करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिले आहेत. महिन्याअखेरीपर्यंत कार्यालय तयार झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते डिसेंबर महिन्यात या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची तारीख निश्चित केली जात आहे, असे पवार यांनी सांगितले.