पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वीकारला पदभार

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आज शनिवारी ५ सप्टेंबर रोजी संदीप बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे ते तिसरे पोलीस आयुक्त आहेत.

औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित करण्यात आले. आर. के. पद्मनाभन पहिले तर दुसरे पोलीस आयुक्त म्हणून संदीप बिष्णोई यांनी काम पहिले. तिसरे आयुक्त म्हणून कृष्ण प्रकाश यांची २ सप्टेंबर रोजी नियुक्ती झाली. मात्र मुदतपूर्व बदली झाल्याने बिष्णोई कॅटमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यात कृष्ण प्रकाश यांनी लागलीच पदभार न घेतल्याने या चर्चेने अधिक जोर धरला. मात्र कृष्ण प्रकाश यांनी शनिवारी आयुक्तालयात हजर होत बिष्णोई यांच्याकडून पदभार स्वीकारला.

संदीप बिष्णोई यांची गेल्या वर्षी अर्थात २० सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २१ सप्टेंबर रोजी त्यांनी आर. के. पद्मनाभन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. एक वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वीच बिष्णोई यांची बदली करण्यात आली. मुदतपूर्व बदली झाली म्हणून, बिष्णोई केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकीकरणकडे (कॅट) धाव घेणार असल्याची चर्चा होती. तसेच त्याबाबतचा सही नसलेला एक ‘ड्राफ्ट’ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपण कॅटकडे जाणार नसून, शासन देईल ती जबाबदारी सांभाळणार आहोत, असे बिष्णोई यांनी ‘लोकमत’ला सांगितले.