मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतील बैठकीत झाली चर्चा
हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण(पीसीएनटीडीए) हे पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरण (पीएमआरडीए)मध्ये विलिन करण्याच्या हालचालींना मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असून त्यावर लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती, सूत्रांनी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची चौथी सभा मुख्यमंत्री तथा अध्यक्ष पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी विधान भवनात पार पडली.
‘पीएमआरडीए’चे बजेट मंजुर
या बैठकीमध्ये पीएमआरडीएच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या 2591 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरीचे महापौर नितीन काळजे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुणे स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाड मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग सचिव नितीन करीर, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त शीतल उगले, पुणे जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.
विलिनीकरणावर सविस्तर चर्चा
या बैठकीत प्राधिकरण पीएमआरडीएत विलिन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. प्राधिकरणाचा अध्यक्ष कोण होणार, पुढे काय करायचे याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुणे शहराच्या लगतच्या भागाचा विकास करण्यासाठी भाजप सरकारने 2015 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली आहे.
प्राधीकरण 13 वर्षे अध्यक्षाविना
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला गेल्या 13 वर्षांपासून अध्यक्ष नाही. 13 वर्षांपासून प्राधिकरणावर प्रशासकीय राजवट आहे. प्राधिकरण अध्यक्षपदाची प्रभारी जबाबदारी ही पुणे विभागीय आयुक्तच सांभाळीत आहेत. 26 ऑक्टोबर 2017 ला या पदाची अतिरिक्त जबाबदारी पीएमपीएमएलचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांच्याकडे देण्यात आली. मात्र, त्यांनी अखेरपर्यंत हा पदभार घेतला नाही. त्यानंतर त्यांची नाशिक महापालिकेत बदली झाली.
मुख्यमंत्री निर्णयाकडे लक्ष
आघाडी सरकारने देखील त्यावर कोणाची नियुक्ती केली नव्हती. भाजपची सत्ता आल्यावर पिंपरी-चिंचवड भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची, जोरदार चर्चा होती. परंतु, सत्ताधारी पक्षातील शहरातील एका बड्या पदाधिकार्याने त्याला विरोध केल्याने त्यांच्या नाव मागे पडल्याची, देखील चर्चा रंगली आहे. आता प्राधिकरणच पीएमआरडीएत विलिन करण्याच्या हालचाली राज्य पातळीवर सुरु झाल्या आहेत. पीएमआरडीए स्थापनेनंतर पीसीएनटीडीए त्यात विलीन करण्याची मागणी पुढे आली होती. मात्र, त्याला शहरातील कारभार्यांनी विरोध केला होता. त्यामुळे मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
नेमकी माहिती नाही : खडके
याबाबत ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते म्हणाले, प्राधिकरण पीएमआरडीएमध्ये विलिन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पीसीएनटीडीएचे चार मजले पीएमआरडीए वापरत असल्याचेही, त्यांनी सांगितले. यासंदर्भात प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश खडके म्हणाले, पीसीएनटीडीएचे चार मजले पीएमआरडीएला वापरण्यासाठी दिले आहेत. जानेवारी महिन्यात दोन आणि एप्रिलपासून दोन मजले वापरण्यासाठी देण्यात येणार आहेत. विलिनीकरणाबाबत आपल्याला काही माहिती नाही.