पिंपरी-चिंचवड मनपातर्फे प्लास्टिक बंदीची कारवाई; ५२ जणांविरोधात कारवाई

0

पिंपरी- राज्य सरकारने आजपासून प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरू केली आहे. शहरातील दुकाने, हॉटेलसह इतर आस्थापनावर धडक मोहीम राबवून आत्तापर्यंत ५२ जणांविरोधात कारवाई करत २ लाख ६० हजारांचा दंड वसूल केला असल्याची माहिती सह आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

अंतिम मुदत

राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्या, चमचे, ग्लास, स्ट्रॉ, थर्माकोल ताट, वाट्या, उत्पादने साठवण्यासाठी असलेली प्लास्टिकची आवरणे, द्रवपदार्थ साठवण्याठी वापरण्यात येणारे प्लास्टिक, अन्न पदार्थ साठवण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक, थर्माकोल डेकोरेशन यावर बंदी घालण्यात आली आहे. २३ मार्च रोजी राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अधिसुचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपवण्यासाठी २२ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत काल संपली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापालिका मुख्यालयात गेल्या आठवड्यापासून प्रवेशद्वारात सुरक्षा रक्षकांकडून प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू केली होती. दरम्यान, आजपासून आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आरोग्य निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली तपासणी पथके नेमली आहेत. या तपासणी पथकाकडून ८ क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणारी दुकाने, हॉटेल्स, तसेच इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. दुकानदार तसेच व्यापारी वर्गाकडून या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने प्रथम यावर उपाययोजना करून बंदीचा निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. कागदी पिशव्यात जास्त वजनाचा माल घेऊन जाता येत नाही. तसेच कागदी पिशवी वापरणेदेखील परवडत नसून त्याचा बोजा ग्राहकांवर पडत आहे.