पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी कॉंग्रेसने माघार घेतल्याने सत्ताधारी भाजपचे मोरवाडीचे नगरसेवक केशव घोळवे यांची बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निकिता कदम यांनी माघार घेतल्याने घोळवे यांची बिनविरोध निवड झाली. घोळवे यांना फक्त पाच महिन्यांसाठी ही संधी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका उपमहापौर तुषार हिंगे यांनी 14 ऑक्टोबरला तडकाफडकी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक झाली. शुक्रवारी महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
आताच लिहून घेतला राजीनामा
राजकीयदृष्ट्या उर्वरित कालखंडात दोन जणांना संधी द्यायची असल्याने उपमहापौरपदी घोळवे यांना केवळ पाच महिन्यांसाठी संधी दिली असून त्यांच्याकडून आत्ताच राजीनामा लिहून घेतला आहे.