पिंपरी -चिंचवड मनपा नगरसेविका दहावी उत्तीर्ण

0

पुणे – शिक्षणाला वयाची कोणतीच अट नसते, हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका कमल घोलप यांनी सिध्द करून दाखवले आहे. वयाच्या ३९ वर्षी त्यांनी १० वी ची परीक्षा देवून ७२ टक्के गुण मिळवले आहेत. राजकारण, संसार करत असताना जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. शुक्रवारी १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये नगरसेविका घोलप या ७२ टक्के गुणांनी उर्तीण झाल्या आहेत.

शाळा सोडल्यानंतर तब्बल २१ वर्षांनी नगरसेविका कमल घोलप या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या असून, दोन मुलांची आई असणाऱ्या घोलप आता ३९ वर्षांच्या आहेत. सध्या त्या निगडीतील प्रभाग क्रमांक १३ मधील नगरसेविका असून त्या “फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. महापालिकेची रोज विविध कामे आटपून, प्रभागातील नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देऊन मिळालेल्या वेळेत त्यांनी अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी प्रभागातील कामे, घर, संसार संभाळून हे यश कमावले. नगरसेविका असलेल्या घोलप यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. पण, वडिलांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने लवकर लग्न झाल्यामुळे त्यांना आपल्या शिक्षणाच्या इच्छेवर पाणी सोडावे लागले होते.