डेंग्यू, चिकनगुन्यासारखे रोग पसरु नयेत यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी!
पिंपरी-चिंचवड महापालिकेने केले आवाहन
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात हिवताप, डेंग्यु, चिकुनगुन्या सारखे रोग पसरु नयेत यासाठी खबरदारी घेण्यात यावी. ताप, तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, स्नायु अथवा सांधेदुखी, मळमळणे, उल्टी अशी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. योग्य वैद्यकिय उपचाराने डेंग्यु, मलेरियामुळे होणारे परिणाम टळु शकतात. ताप आल्यास तातडीने रक्त महापालिकेच्या रुग्णालयात तपासून घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. हिवताप, डेंग्यु व चिकुनगुन्या या रोगांच्या साथी उद्भवू नयेत यासाठी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. हिवताप हा आजार एनॉफिलस, डेंग्यु, चिकुनगुन्या हे आजार पसरवण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत असतात. हिवताप, डेंग्यु किंवा चिकुनगुन्या झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप/डेंग्यु/चिकुनगुन्याचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात असा विषाणुजन्य डास निरोगी माणसास चावल्यास त्याला हिवताप/डेंग्यु/चिकुनगुन्या होण्याची शक्यता वाढते.
साठवलेल्या पाण्यात डास
त्यामुळे हिवताप/डेंग्यु/चिकुनगुन्या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागेल. एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासांची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. या अंड्यातून बाहेर पडणार्या डासांच्या अळ्या त्याच पाण्यात वाढतात. पाच दिवसानंतर या आळ्यांचे कोष बनतात, हे कोषही पाण्यातच जिवंत राहतात. कोषातुन दोन दिवसांनी डास बाहेर पडतात. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते. घरात पाण्याची साठवण करतो. या साठलेल्या पाण्यात डासांच्या अळया वाढतात. त्यामुळे डासांची उत्पत्ती विनासायास होते. डासांच्या अंडयापासुन त्याचा डास होण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. त्यासाठी आठवड्यातून एकदा साठलेले पाणी पुर्णपणे वापरुन ड्रम कोरडा करावा. सुकवून किंवा कोरडी थोड्यावेळाने पुसुन नंतर परत भरला तर त्या पाण्यात असलेल्या पण नजरेस न दिसणार्या अंडी/अळया मारल्या जातील. घरामध्ये आपल्याकडुन दुर्लक्षित असणारे साठलेले पाणी फ्लॉवरपॉट, कुलर, मनी प्लॅन्ट, घरातील छोटे शोभेचे कारंजे, फ्रिजचा खालचा ट्रे अशा ठिकाणी असते. आठवड्यातून एकदा यातील पाणी बदलावे. हिवताप/डेंग्यु/चिकुनगुन्या या रोगाचा प्रसार वाढु नये म्हणुन डास उत्पत्तीवर नियंत्रण महत्वाचे आहे.
हे उपाय करा
घरात पाणी साठविण्याची सर्व भांडयातील पाणी वापरुन रिकामी करुन कोरडी करावीत, मोठ्या टाक्यांना घट्ट झाकण बसविण्यात यावे, घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रिजचा खालचा ट्रेमधील पाणी दर आठवडयास रिकामे करावे, घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी, मच्छरदाणीचा वापर करावा, दरवाजे खिडक्यांना जाळी बसवावी, ताप आल्यास रक्ताची तपासणी करुन घ्यावी, संडासाच्या टाक्या उघडया ठेवु नये, नळ किंवा बोरिंगचे पाणी वाहु देऊ नये.