स्थायी समितीकडून मान्यता
पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सायन्स पार्क शेजारील आरक्षण क्रमांक 181 ड मधील जागेवर 13.70 हेक्टर जागेवर बिझनेस सेंटर प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सदरील प्रकल्पाकरिता मे. क्रिसिल इन्फ्रास्ट्रक्चर यांची थेट पध्दतीने सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यास ऐनवेळी आलेल्या विषयास स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडिगेरी हे होते.
व्यापार वाढीचे नियोजन…
चिंचवड येथील सायन्स पार्क शेजारील आरक्षण क्रमांक 181 ड मधील जागेवर 13.70 हेक्टर जागेत बिझनेस सेंटर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पात व्यापारी गाळे, कार्यालये, सभागृह व अनुषंगिक व्यापारी वापर होणारी कामे करण्याचे नियोजन आहे. सदरील प्रकल्पाच्या नियोजन व सल्लागार म्हणून मे. क्रिसिल इन्फ्रास्ट्रक्चर यांनी नियुक्ती करण्यात आली. या प्रकल्पांच्या विस्तृत अहवाल तयार केला असून त्याचे आर्थिक व व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. त्यानूसार निविदा कार्यवाही करण्यात आली. परंतू, निविदा पुर्व सभेला चांगला प्रतिसाद लाभून सुध्दा प्रत्यक्ष निविदा कार्यवाहीत केवळ तीन ठेकेदार यांनी सहभाग घेतला. त्यात सर्वाधिक दर दोनशे कोटी रुपये इतका प्राप्त झाला होता. ते दर अपेक्षेपेक्षा कमी असल्याने सदरील निविदा अपात्र करण्यात आली.
दहा वर्षाचा कालावधी लागणार…
नव्याने करावयाच्या नियोजनाबाबत आणि यापुर्वी मे. क्रिसिल यांच्याकडून केलेल्या कामापोटी 17.41 लाख इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सदर कामास सुमारे दहा वर्षाचा कालावधी लागणार असल्याने मे. क्रिसिल इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून नव्याने करावयाच्या कामाच्या शुल्काची मागणी केलेली आहे. त्या प्रकल्पाच्या नियोजनाचा पुर्न अभ्यास करुन नव्याने टेक्नो कर्मशिअल प्रपोजल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे प्रकल्पाची जागा भू- भाड्याने देणे, प्रकल्प उभारणीस पात्र विकासकांकडून मनपास रितसर एक रकमी विकसन शुल्क आणि कायम स्वरुपी दरवर्षी कर भरुन देण्याचे नमुद केले आहे. यामुळे महापालिकेला सुमारे 30 ते 50 रुपयाचे उत्पन्न कायमस्वरुपी मिळणार आहे. दरम्यान, सदरील प्रकल्पाकरिता मे. क्रिसिल इन्फ्रास्ट्रक्चर यांची थेट पध्दतीने करारनामा न करता नेमणूक करणेस व टप्पेनिहाय 40.59 लाख इतकी शुल्क अदा करणेबाबत स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
००००००