पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे हे बिलांचे पैसे अदा करण्याच्या बदल्यात तीन टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारी ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर केल्या आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याची तात्काळ घेत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून खुलासा मागितला आहे. यामुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लांडे सतत वादात
लांडे तीन वर्षापूर्वी नाशिक महापालिकेतून बदली होऊन पिंपरी पालिकेत आले आहेत. पालिकेतील कर्मचार्यांना दिवाळीत देण्यात येणारे सानुग्रह अनुदान त्यांनी अडविले होते. त्यावरुन कर्मचारी महासंघ आणि लांडे यांच्यामध्ये ’झगडा’ झाला होता. तत्कालीन महापौर शकुंतला धराडे यांच्यासोबतही त्यांची सानुग्रह अनुदानावरुन वादावादी झाली होती. अखेरीस तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यामध्ये समेट घडवून आणून सानुग्रह अनुदानाची रक्कम कर्मचार्यांना दिली.
बदलीचा केला होता ठराव
महापालिका सर्वसाधारण सभेत लांडे यांच्या बदलीचा ठरावदेखील केला होता. परंतु त्यांनी नगरविकास खात्याचा दबाव आणून आपली नियुक्ती कायम ठेवली. एवढेच नव्हे तर आपले दालन प्रशस्त केले. कार्यालयाची रचना बदलली. लांडे यांनी सत्ताधारी पदाधिकार्यांच्या दबावाखाली 31 मार्चची मुदत संपल्याचे कारण पुढे करत 160 कोटी रुपयांची ठेकेदारांची बिले अडविली आहेत. ज्या ठेकेदारांची बिले रोखून धरली आहेत. त्या ठेकेदारांनी थेट पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर तक्रार केली. थकित देयके काढण्यासाठी मुख्यलेखापाल लांडे हे तीन टक्के रक्कम मागत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने गंभीर दखल घेत आयुक्तांकडे खुलासा मागितला आहे.
प्रशासकीय कार्यवाही सुरू
याबाबत आयुक्त हर्डीकर म्हणाले, लांडे यांच्या विरोधात महिन्याभरापूर्वी पीएम पोर्टलवर तक्रार केली होती. ती तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली आहे. त्यामध्ये देयक देण्यासाठी तीन टक्के जास्त मागत असल्याचा उल्लेख केला आहे. याबाबत लांडे यांच्याकडून खुलासा मागितला असून, तो प्राप्तदेखील झाला आहे. त्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरु आहे. कार्यवाही झाल्यानंतर तो खुलासा पीएम पोर्टलकडे पाठविण्यात येणार आहे. तक्रारकर्त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी तक्रारकर्त्या व्यक्तीची माहिती मागविली होती. परंतु, ती आम्हाला मिळाली नाही. तक्रारकर्त्या व्यक्तीने याबाबत आणखी पुरावा द्यावा.
..एसीबीकडे तक्रार करा : आयुक्त
महापालिकेतील कोणताही अधिकारी नागरिकांकडे नियमबाह्य पैशांची मागणी करत असेल तर संबंधित अधिकार्याची एसीबीकडे तक्रार करुन त्यांना पकडून द्यावे, असे आवाहन हर्डीकर यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना केले.
तक्रारीबाबत माहिती नाही : लांडे
दरम्यान, याबाबत राजेश लांडे यांच्याशी संपर्क साधला असता, अशा काही तक्रारीबद्दल मला काहीही माहिती नाही. तक्रार काय आहे ते पाहून प्रतिक्रिया देईल, असे त्यांनी दैनिक जनशक्तिशी बोलताना सांगितले.