पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळाला केंद्र शासनाचा बेस्ट असेसिबल बेवसाईट नॅशनल अवॉर्ड प्राप्त झाला आहे. दिव्यांग्य व्यक्तिंना हाताळण्याच्या दृष्टीने महापालिकेचे संकेतस्थळ परिपूर्ण असल्याने केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाकडून हा पुरस्कार देण्यात आला. विज्ञान भवन नवी दिल्ली येथे सोमवारी अपंगदिनानिमीत्त उपराष्ट्रपती व्यैंकया नायडू यांच्याहस्ते महापौर राहुल जाधव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकार निळकंठ पोमण यांनी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री विजय सांपला, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री क्रिशन पाल गुर्जर, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्विकारला.
पुरस्कार प्राप्त प्रथम स्थानिक संस्था…
केंद्रशासनाच्या दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभागाने दि. 6 नोव्हेंबर 2018 च्या पत्रानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळास दिव्यांग पूरक संकेतस्थळ निर्मीती बेस्ट असेसिबल बेवसाईट नॅशनल अवॉर्डसाठी निवड झाल्याबाबत कळविले होते. अशा प्रकारचे पारितोषिक मिळविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नावारुपाला आली आहे. केंद्र शासनाच्या डिसअँबेलिटीसाठीच्या मार्गदर्शक तत्वानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी तयार केलेली संकेतस्थळे (वेबसाईट) दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपुर्ण करण्याबाबत महाराष्ट्र शासनामार्फत कळविण्यात आले होते. त्याची दखल घेत सदर संकेतस्थळाचे वेबसाईट असेसीबिलिटी ऑडीट करुन घेत त्याची पुर्तता करण्यात आली आहे. सध्यस्थितीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना वापरण्याच्या दृष्टीने परिपुर्ण असल्याने पुरस्कारासाठी पात्र ठरली.
मार्गदर्शक सुचनांचा परिपुर्ण अभ्यास..
पिंपरी चिचवड महानगरपालिकेचे संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना हाताळण्यास उत्कृष्ट संकेतस्थळ याकरीता राष्ट्रीय पुरस्कार 2018 साठी केंद्रशासनाचे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, नवी दिल्ली येथे दि. 29 ऑगस्ट 2018 रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांचा महापालिका स्तरावर अभ्यास करून संकेतस्थळ दिव्यांग व्यक्तिंना वापरण्याच्या दृष्टीने परिपूर्ण करण्यात आलेले आहे.