पिंपरी:- राज्यसरकारच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली असून, शहराचा समावेश नॉन रेडझोनमध्ये करण्यात आला आहे. तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नवीन आदेश दिले असून त्याची अंमलबजावणी 1 जून सोमवारपासून करण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या परवानगी शिवाय आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, रेल्वे प्रवासी वाहतूक, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लास, हॉटेल ,रेस्टॉरंट, सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, बार, सभागृह, नाट्यगृह, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे.
औद्योगिक आस्थापनामध्ये कामावर उपस्थित राहण्यासाठी रेड झोन मधून येण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी आवश्यक राहणार आहे. औद्योगिक आस्थापना शंभर टक्के सुरू ठेवता येतील मात्र, कामगार हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील असले पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे.