पिंपरी-चिंचवड शहरात वाहने झाली उदंड!

0

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नव्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आरटीओकडे नव्या वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात पुणे आरटीओ विभागाने वाहन नोंदणीत राज्यात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळविले आहे. या विभागात वर्षभरात तब्बल 4 लाख 45 हजार 400 वाहनांची नोंदणी झाली आहे. या विभागात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन मोठ्या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे वेगाने वाढणार्‍या या दोन्ही शहरांमधील वाहनांच्या वाढत्या संख्येसोबतच प्रदूषणाचीही समस्या ‘आ’ वासून उभी राहणार आहे.

पुणे आरटीओ विभाग प्रथम
चांगले रस्ते, मुबलक सोयी-सुविधा, वेगाने वाढणारी लोकसंख्या, समाजाचा वाढणारा स्तर आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्याबाबत असलेली उदासीनता यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन महानगरांमध्ये वाहन खरेदीचा आकडा वर्षागणिक वाढत आहे. पुणे आरटीओ विभागामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरासह सोलापूर, बारामती, अकलूज या महत्त्वाच्या शहरांचा समावेश होतो. यातील पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती या तीन शहरांमध्ये वाहन नोंदणीचा टक्का अधिक आहे. त्यामुळे पुणे आरटीओ विभागाने राज्यात 4 लाखांहून अधिक वाहनांची नोंद करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

टॉप पाच आरटीओ विभाग
पुणे आरटीओ विभागाच्या खालोखाल ठाणे आरटीओ विभागात सर्वाधिक वाहनांची नोंदणी झाली आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात ठाणे आरटीओ विभागाकडे 2 लाख 64 हजार 250 वाहनांची नोंद झाली आहे. ग्रेटर मुंबई या आरटीओ विभागात वर्षभरात 2 लाख 6 हजार 800 वाहनांची नोंद झाली असून, या विभागाने राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे. या विभागानंतर नाशिक : 1 लाख 76 हजार 309, कोल्हापूर : 1 लाख 60 हजार 595, या विभागांचा क्रमांक लागतो.