250 जणांना दिल्या नोटीसा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक लागले आहेत. यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत असून शहराला बकालपणा आला आहे. शहरात तब्बल 881 अनधिकृत फलक लावले आहे. त्यापैंकी 250 जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. या सर्व अनधिकृत फलकधाराकांना नोटीसा देऊन कडक कारवाई करण्याची सूचना स्थायी समितीने केली आहे. आकाशचिन्ह विभागाच्या सर्व्हेत 881 फलक अनधिकृत असल्याचे उघड झाले. त्यातील 200 जणांना अडीच पट दंडाच्या नोटीसा पाठवल्या. उर्वरीत फलकधारकांना आठवड्यात नोटीसा मिळतील. यातून सुमारे 13 कोटी 84 लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. सर्व्हेचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. सात दिवसांच्या मुदतीत दंड भरल्यास फलक नियमित केले जातील. ज्यांनी दंड भरला नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे.
आकाशचिन्ह परवाना विभागाच्या सर्व्हेत अनेक फलकधारकांनी महापालिकेकडून 10 बाय 10 च्या फलकाची परवानगी घेऊन 10 बाय 20 चे फलक उभे केले आहेत. ती संख्या 90 टक्के आहे. स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, शहरामध्ये सगळीकडेच अनधिकृत फ्लेक्सचा विळखा असताना फक्त सर्व्हेमध्ये 881 फलक अनधिकृत दाखवले आहेत. हा आकडा चुकीचा असून यापुढे अनधिकृत फ्लेक्स धारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.