पिंपरी – चिंचवड शहरामध्ये दोन वर्षातील अपघातात १८९ जणांचा मृत्यू

0

पिंपरी – चिंचवड : प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पाहणीनुसार रस्ते अपघातामध्ये पिंपरी चिंचवड शहरात गेल्या दोन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.प्रमुख चौकांमध्ये अपघातांच्या संख्येतही वृद्धी नोंदविण्यात आली आहे.पिंपरी आणि चिंचवड परिसरात गेल्या दोन वर्षात १८९ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर ८४० जण जखमी झाले आहेत.

अपघातांचे गांभीर्य लक्षात घेऊन दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरणे सुरक्षिततेच्या दृष्टीने आत्यावशक आहे.याकरिता महाराष्ट्र पोलीस दलाच्या ६९ व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने शनिवार ५ जानेवारी रोजी हेल्मेट वापरण्याकरिता जनजागृती अभियान राबविले गेले. सदरच्या अभियानासाठी मार्गदर्शन शहराचे सहआयुक्त मकरंद रानडे,सहायक पोलिस आयुक्त राम जाधव, निगडी पोलीस ठाण्याचे व.पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे,पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे यांनी केले. जनजागृतीच्या व पोलीस स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या शिष्टमंडळाने सह आयुक्तांची नूतन आयुक्तालायमध्ये भेट घेतली व शुभेछा दिल्या. या प्रसंगी राज्य समिती अध्यक्ष विजय पाटील,संपर्क प्रमुख विजय मुनोत,महिला अध्यक्ष अर्चना घाळी, विभागप्रमुख बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण,शुभम वाघमारे उपस्थित होते.

सह आयुक्त मकरंद रानडे म्हणाले,” शहराच्या सुरक्षतेसाठी पिंपरी चिंचवड शहर पोलीस दल कटिबद्ध असून नवीन प्रशासकीय इमारतीमुळे सर्व कामे आता जलदगतीने पार पडतील. नागरिकांच्या व सामाजिक संस्थांच्या सहभागामुळे पोलीस दलास नक्कीच ऊर्जा प्राप्त होत असते.”

समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” प्राधिकरण नागरी सुरक्षा समितिचे पोलीस मित्र, स्वयंसेवक,व विशेष पोलीस अधिकारी हे दुचाकी वाहनचालकांनी “हेल्मेट” वापरावे याकरीता शहरात प्रबोधन व जनजागृती करीत आहेत. या जनजागृती मोहीमेमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. दुचाकी चालकांनी स्वयंप्रेरणेने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.वाढत्या दुचाकी संख्येमुळे शहरातील रस्ते अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.त्यामुळे सुरक्षा हेतू हेल्मेट वापरण्याची सवय अंगिकारणेच योग्य राहील.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे म्हणाले,”आपल्या शहर परिसरात महाविद्यालयांची संख्या जास्त आहे.त्यामुळे युवकांनी दुचाकी चालवताना हेल्मेट वापरण्याची सवय अंगिकारने आवश्यक आहे.निगडी प्राधिकरण परिसरातील रस्ते विस्तृत असल्याने चालकांनी वेगावरही नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.अपघात रोखण्यासाठी सुरक्षा साधणे वापरने गैर नाही.”